Jalgaon News : पोलिस कर्मचाऱ्याचा डेंग्यूने मृत्यू; कसा होतो डेंग्यूचा प्रसार ?

जळगाव : डेंग्यूची लक्षणे असल्याने उपचार सुरु असलेले रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अशफाक मेहमूद शेख (३५) यांचा सोमवार, १६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मृत्यू झाला.

शेख यांना डेंग्यूची लक्षणे असल्याने त्यांच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना (सोमवारी, १६ सप्टेंबर) मृत्यू झाला.

शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेख यांचा मृतदेह जळगावात आणण्यात येऊन सोमवारी संध्याकाळी दफनविधी करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

असा होतो डेंग्यूचा प्रसार
डेंग्यू व्हायरसचे चार प्रकार असून रुग्णाला चार वेळा डेंग्यू होऊ शकतो. ‘एडीस इजिप्ती’ या डासांच्या चावण्यातून किंवा क्वचित ‘एडीस अँलोप्टीक्स’ या डासांमुळेसुद्धा डेंग्यू होतो. हा डास दिवसाच चावतो. त्यांची अंडी थंड व कोरड्या वातावरणात वर्षभर जिवंत राहू शकतात. डास माणसाच्या अंगावरील विशिष्ट रसायनांमुळे आकर्षित होतात. डासांची उत्पत्ती ही गवताळ व छोट्या वनस्पतीत साचलेले पाण्यात होते. त्यामुळे संसर्ग झालेल्या रुग्णांना नवीन ठिकाणचे डास चावले अन् तेच डास निरोगी माणसास चावले तर संसर्ग हा चटकन पसरतो.

डेंग्यू तापची लक्षणे
रुग्णाला दिवसातून दोन वेळा ताप येतो. तसेच डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, घसा दुखणे, अशक्तपणा, अंगावर लाल पुरळ व मळमळ, भूक मंदावणे, पोटदुखीचा त्रास जाणवतो. डेंग्यू हिमरेजिकमुळे नाकातून रक्तस्राव, पोटात आतड्यांचा रक्तस्राव होतो.