जळगाव : विम्यावर अधिक बोनसबरोबरच मेडिकल कव्हर मिळवून देण्याचा बहाणा करत सायबर ठगांनी एका तरुणाला ८ लाख ९५ हजार ६४६ रुपयांना चुना लावला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी गोव्यातील बॅक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज प्राप्त केले. त्यानंतर पथकाने गाझीयाबाद येथून सौरभ प्रमोदकुमार शर्मा ( वय ३० रा. गुलधार २ गाझियाबाद उ.प्र.) याला ताब्यात घेतले. विमा पॉलिसीवर बोनस रक्कम मिळवून देतो, अशी थाप देत सायबर ठगांनी तक्रारदार तरुणाच्या व्हॉटसअॅप मोबाईलवर वारंवार संपर्क साधला.
तरुणाचा विश्वास प्राप्त करण्याच्या हेतूने बनावट बॉण्ड पेपर तसेच इन्कम टॅक्सचे प्रमाणपत्र व्हॉटसअॅपवर पाठविले. त्यानंतर तरुणाकडूनवेळोवेळी ८,९५,६४६ रुपये ऑनलाईन स्वीकारले. याप्रकरणी कोणताच परतावा न मिळाल्याने तरुणाने डिसेंबर २०२३ मध्ये जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. संशयितांनी पणजी- मडगाव येथील एटीएममधून पैसे काढल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार पथक घटनास्थळी रवाना झाले.
या बँक एटीएममशीन च्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेतले. त्याचा अभ्यास करुन सायबर पथक गाझीयाबाद उत्तरप्रदेश येथे धडकले. येथुन संशयिताला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्सटेबल प्रवीण वाघ, पोलीस हेडकॉन्सटेबल राजेश चौधरी, पोलीस हेड कॉन्सटेबल दिलीप चिंचोले, पोलीस कॉन्सटेबल दीपक सोनवणे यांनी मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.