घराच्या दरवाजाला कुलूप लावून जाणे म्हणजे चोरट्याला चोरी करण्यास आयते कोलीत देणे, अशी परिस्थिती जळगावात झाली आहे. परंतु तरीदेखील काही नागरिक घराला कुलूप लावून गावाला जाण्याची रिस्क घेताना दिसताहेत. असे बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तसेच कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. सोने चांदीचे दागिने असा एकूण 63 हजाराचा ऐवज घेवून चोरटे पसार झाल्याची घटना कांचननगरातील रविशंकर नगरात शनिवार, 14 रोजी सकाळी उघडकीस आली.
एकनाथ भगवान सपकाळे (58) हे हातमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते शिवशंकरनगर कांचननगर परिसर नयन किराणाजवळ याठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. एकनाथ सपकाळे घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गावी गेले. चोरट्यांनी ही संधी हेरत या बंद घराचा कडीकोयंडा तोडला. आत घरात प्रवेश करुन चोरट्यांनी लोखंडी कपाटाकडे मोर्चा वळविला. मुद्देमाल हाती लागताच चोरट्यांनी येथून पलायन केले. याप्रकरणी एकनाथ भगवान सपकाळे (58) रा. रविशंकरनगर यांच्या तक्रारीवरुन शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउपनि चंद्रकांत धनके हे करत आहे.