Jalgaon News: मनपाचा भोंगळ कारभार, काय घडलं?

जळगाव: मनपाच्या गलथान कारभारामुळे भिक्षा मागणारी एक अंध वृद्ध महिला गटारीच्या चेंबरमध्ये पडल्याची घटना गोलांनी मार्केट परिसरात घडली. स्थानिक लोकांनी अथक प्रयत्न करत या अंध वृद्ध महिलेला दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले आहे. गटारीच्या चेंबरवर झाकण नसल्याने ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिक्षा मागणारी एक अंध वृद्ध महिला काल, १२ रोजी गटारीच्या चेंबरमध्ये पडली. प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. महिलेला बाहेर काढण्यास वेळ झाला असता तर कदाचित या ठिकाणच्या घाणेरड्या पाण्यामध्ये तसेच अस्वच्छतेमध्ये गुदमरून या महिलेचा मृत्यू झाला असता. महपालिकेच्या अगदी जवळ असलेल्या उघड्या चेंबरकडे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून महापालिकेच्या गलथान आणि भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दोन वर्षांपासून हा चेंबर अशाच पद्धतीने त्यावर झाकण नसल्याने उघड्या अवस्थेत आहे. त्यामुळे या चेंबरमध्ये आतापर्यंत सात ते आठ नागरिक पडले आहेत. सुदैवाने त्यांना वाचविण्यात यश आले आहे. मोठी दुर्घटना घडण्याच्या आधी या चेंबरवर झाकण बसवावे, तसेच या परिसरातील अस्वच्छता दूर करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील रस्त्यांसह विविध समस्यांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण केलं होते.