jalgaon news: मनपाचा लोगो वापरून होतेय खासगी व्यावसायिकांची जाहिरात

जळगाव : डॉ. पंकज पाटील : महापालिकेने सुरू केलेल्या विविध सोशल मीडिया प्लॅटफार्मवर मनपाचा लोगो वापरून खासगी व्यावसायिक त्यांच्या सुविधांची जाहिरात करत आहे. त्यामुळे या सोशल मीडियाला भेट देणाऱ्या नागरिकांनी मनपाच्या सेवा-सुविधा बघाव्यात की या खासगी व्यावसायिकाच्या जाहिराती पाहून त्यांच्या सशुल्क सेवांचा लाभ घ्यावा, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. अनेकजण फेसबूक, इन्स्टाग्राम, व्टिटर, व्हॉटसॲप चॅनल यासारख्या सोशल मीडियाचा वापर करत असतात. त्यामुळे या वापरकर्त्यांपर्यंत महापालिकेच्या विविध कामांची, सेवांची, सुविधांची, उपक्रमांची माहिती होण्यासाठी महापालिकेने शहरातील एका खासगी व्यावसायिकांशी करार केला आहे. सीआरएस फंडातून हा करार करून मनपाने खासगी संस्थेला मनपाचे सोशल मीडियाचे हॅण्डलर म्हणून काम दिलेले आहे. या करारानुसार ही संस्था महापालिकेस 3 वर्षापर्यंत ही सेवा मोफत देणार आहे. या सेवेचा अधिकृत शुभारंभ 2 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

मोफत सेवेच्या नावाखाली स्वत:ची जाहिरात

जळगाव शहरातील एका खासगी व्यावसायिकांने मनपाच्या फेसबूक पेजवर विविध पोस्ट अपलोड केलेल्या आहेत. त्यावर मनपाचा लोगो, सामाजिक संदेश देत त्याखाली जाहिरात असे लिहीत स्वत:च्या व्यावसायिक सेवेची ठळकपणे जाहिरात करत आमच्या सशुल्क सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही केलेले आहे.सोशल मीडियाची सेवा मनपाला मोफत देत असले तरी मनपाच्या फेसबूक पेजचा वापर स्वत:च्या व इतर संस्थांच्या व्यावसायिक जाहिरातीसाठी सदर संस्था करत असताना महापालिकेने त्याकडे

दुर्लक्ष्ा केल्याचा आरोप करण्यात  येत आहे.

दुसऱ्या संस्थांच्याही जाहिराती संबंधित मोफत सेवा देणाऱ्या संस्थेने स्वत:च्या व्यावसायिक जाहिरातीसोबतच एक शाळा, एक न्यूज पोर्टलचीही जाहिरात मनपाच्या लोगोच्या पोस्टखाली केलेली आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.