---Advertisement---
जळगाव : महापालिका हद्दीतील 250 रस्त्यांची कामे ही पीडब्ल्यूडीकडून तर उर्वरित कामे ही महापालिकेतर्फे करण्यात येत आहेत. या कामांबाबत महापालिका व पीडब्ल्यूडी या दोन्ही विभागात योग्य समन्वय नसल्याने रस्त्यांची कामे केली जात नाहीत. काही भागात रस्त्याची कामे सुरू असली तरी त्याचा दर्जा योग्य नसल्याचा आरोप होत आहे. परिणामी करदात्यांचा रोष वाढत आहे. याबाबत दोन्ही विभाग ऐकमेकांकडे बोट दाखवत वेळकाढू पणा करत आहेत. याबाबत तरूण भारतने रविवार, 29 ऑक्टोबर रोजी ‘प्रशासक साहेब, तयार केलेल्या रस्त्याचा दर्जा व एक्सपायरी डेट जाहीर कराच’ असे वृत्त दिले होते. त्याची दखल थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेत 31 ऑक्टोबर रोजी दोन्ही विभागांची बैठक घेत दोघांना रस्त्यांची यादी ऐकमेकांना देण्यासाठी 2 नोव्हेंबर ही ‘डेडलाईन’ दिली आहे.
जळगाव महानगरपालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या विविध योजना, जिल्हा नियोजन समितीकडील मंजूर निधीतून विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यातील काही कामे प्रगतीपथावर असून काही कामांचे कार्यादेश देण्याची कार्यवाही सुरु आहे. रस्त्याची कामे गतीने व गुणवत्तापूर्वक पूर्ण व्हावी, रस्त्याच्या कामांशी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असावा, यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 31 ऑक्टोबर, रोजी दु.2 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, महानगरपालिका शहर अभियंता सी.एस.सोनगीरे, महावितरण कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, उपअभियंता संजय राठोड, आर.एम.पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आदी उपस्थित होते.
असे दिले आदेश
मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे सुरू असलेल्या, सुरू होणाऱ्या रस्त्यांच्या मनपा ( मल:निस्सारण व पाणीपुरवठा संयोजने) महावितरण, दृरध्वनी कंपनी यांनी त्यांचे नकाशे बांधकाम विभागाला 2 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे. त्यानुसार मनपा व बांधकाम विभागाने रस्त्याची कामे करावीत. रस्त्याच्या कामामध्ये एका बाजुकडून दुसऱ्या बाजुला नळ, वायरी नेण्यासाठी क्रॉसींग तयार करण्याबाबतचे नकाशे गुरुवार ,2 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे. कोणत्या रस्त्यांची कामे कधी करण्यात येणार आहे याची यादी बांधकाम विभागाने मनपाला द्यावी. तर मनपाने त्यांच्यातर्फे करण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी बांधकाम विभागाला द्यावी. या सर्व याद्या आरटीओ व पोलीस विभागास द्यावी. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन ते करतील. रोड क्रॉसिगच्या ठिकाणी चेंबर बांधकाम विभाग करेल. मात्र त्याच्या जागा मनपाने निश्चित करून द्याव्यात. संवदेनशील किंवा वादाची शक्यता असलेल्या भागातील रस्त्यांची कामे करताना पोलीस बंदोबस्त हवा असल्यास तो देण्यात यावा. तशी मागणी मनपाने करावी. रस्त्याच्या कामात अडचणीचे ठरणारे वीजेचे पोल, रोहीत्र हलविण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे शुल्क जमा करून त्वरीत ते हलवावे. त्याचे तीन्ही विभागाने सर्वेक्ष्ाण करावे. शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाबाबत मनपा, बांधकाम विभाग, वाहतूक शाखा यांनी सयुंक्त सर्वेक्ष्ाण करून योग्य निर्णय घ्यावा. तसा अहवाल बांधकाम विभागास कळवावा.