Jalgaon News: महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला बदल्यांचे वावडे

जळगाव :  महापालिकेत प्रशासकीय कारणांमुळे आणि एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. मात्र या बदल्यांना अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांचा अपवाद आहे. तत्कालिन आयुक्त तथा प्रशासकांनीही अतिक्रमण निर्मूलन विभागातील ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माशी कोठे शिंकली आणि हे कर्मचारी पुन्हा त्याच विभागात कार्यरत झालेत.

शासन असो की महापालिका ३ वर्ष एकाच विभागात काम झालेत्यांच्या प्रशासकीय स्तरावर बदल्या होत असतात. तत्कालिन प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनीही त्यांच्या अधिकारात महापालिकेच्या विविध विभागात बदल्याचे सत्र सुरू केले. आयुक्तांच्या कार्यालयातील शिपायांपासून तर विविध विभागातील कर्मचाऱ्यांची बदली केली गेली. अनेकांचे टेबल बदवले गेलेत. यात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहआयुक्त यांच्याकडील पदभारही बदलवले गेले. यामुळे बराच गोंधळ झाला. मात्र रुटीनमध्ये तो निवळला गेला.अतिक्रमणवर मेहरबाणी का? अतिक्रमण निर्मूलन विभागात काही कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले आहेत.

आता अतिक्रमण विभागप्रमुख म्हणून नगररचना विभागातील अभियत्यांची नियुक्ती केली गेली. मात्र या ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत आस्थापना विभागासह प्रभारी आयुक्तानीही दुर्लक्ष केले आहे. मागे याच विभागातील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत पत्ते खेळताना सापडले होते. त्यांचे व्हिडीओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. मात्र त्यांच्यावर मनपा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे याबाबत महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा होत असून देवाण- घेवाणीचा आरोपही केला जात आहे.वादग्रस्त विभाग तरीही… अतिक्रमण निर्मूलन विभागावर अतिक्रमणधारकांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप होत असतो.

अतिक्रमणाबाबत तक्रार आल्यानंतर कारवाई होण्यापूर्वीच अतिक्रमणधारकांना सूवना मिळत असते. त्यामुळे ते आधीच निघून जातात. मात्र ज्यांच्याकडून हप्ते मिळत नाही किंवा वाढवून देत नाही त्यांच्यावर या पथकाकडून कारवाई केली जाते. आर्थिक तडजोड करून सोडविल्या जातात गाड्या कारवाई करताना जप्त केलेले साहित्य व गाड्याची थेट नोंद न करता ते ट्रॅक्टरव्दारे आणले जाते. अतिक्रमणधारकांसोबत तोडीपाणी करून कमी रकमेची पावती फाडून साहित्य परस्पर सोडले जाते. कारवाई केल्याचे कागदोपत्री दिसावे आणि दंडाची रक्कम दिसावी म्हणून तेवढी ऑन पेपर आणले जाते, असा आरोप होत आहे. तरीही अतिमक्रण कायमच कसे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहराच्या विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जाते. चार दिवसांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी तेच अतिक्रमणधारक अतिक्रमण करत असतात. रिंगरोड चौक ते गणेश कॉलनी, महाबळ, मनपाच्या मुख्य इमारतीपासून तर थेट सुभाष चौक, शहर पोलीस स्टेशन, बळीराम पेठ, छत्रपती शिवाजी पुतळा, बहिणाबाई गार्डन चौक यासारख्या मुख्य स्स्त्यांवर अतिक्रमणांचा बाजार भरत असतो.

मार्केटमधील अतिक्रमणास गाळेधारक जबाबदार : रस्त्यावरील अतिक्रमणांना कोण?
फुले मार्केटमधील पार्किंगच्या जागेवर होणाऱ्या अतिक्रमणांना संबंधित गाळेधारक जबाबदार असल्याचे महापालिका सांगत असते, तर रस्त्यावरील
अतिक्रमण काढणे हे महापालिकेचे काम असल्याचे मान्य करते. असे असतानाही रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असताना ते का काढण्यात येत नाही, असा प्रश्न जळगावकर विचारत आहेत. अतिक्रमण वाढत असताना महापालिकेचे आयुक्त, अतिक्रमणचे उपायुक्त त्याकडे डोळेझाकपणा करत असल्याने त्यांच्यापर्यंत हप्ते पोहचतात की काय, असाही आरोप आता उघडपणे होत आहे.