जळगाव : मेहरूण तलाव परिसरातील कॉलन्यांमधील सांडपाणी तलावात सोडण्यात येत आहे. याबाबत वारंवार पर्यावरणप्रेमींकडून महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही त्यावर काही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे आता नागरिकांनी गटारींच्या पाण्यात गणेश विसर्जन करायच का? असा प्रश्न गणेशभक्तांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सा.बां. विभाग, मनपा व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत विसर्जन मार्ग व मेहरुण तलावाची पाहणी केली. तसेच तलावात जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपायोजना करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.
शहराच्या सौदर्यात भर घालणाऱ्या मेहरूण तलावात आजूबाजूच्या कॉलन्यांमधील सांडपाणी सर्रास सोडले जात आहे. याबाबत अनेक वेळा पर्यावरणप्रेमी व सुज्ञ नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, परंतु महापालिका प्रशासनाकडून त्या तक्रारींची दखल घेतली गेली नसल्याचे दिसून येत आहे.
मनपाने झटकले हात
तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याबाबत पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून तक्रारी झाल्या, त्यावेळी जे नागरिक तलावात पाणी सोडतात, त्यांना बिल्डींग बांधकाम परवानगी देताना त्यांच्या मालमत्तांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी त्याच मालमत्ताधारकांची आहे, असे सांगून मनपा प्रशासनाने हात झटकण्याचे काम केले आहे.वेळीच महापालिका प्रशासनाने हा विषय गांर्भियांने घेऊन तेथील नागरिक व मनपा यांनी समन्वयाने हा विषय सोडविणे गरजेचे होते, परंतु ती आमची जबाबदारी नसून, त्या नागरिकांनी त्यासाठी उपाययोजना करावी, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
वास्तविक महापालिकेने जे लोक मेहरुण तलावात सांडपाणी सोडतात, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे होते. त्या लोकांकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प तयार करून घेणे गरजेचे होते. पण तसे न झाल्यामुळे जळगावकर नागरिकांना गटारींचे पाणी सोडलेल्या मेहरुण तलावात गणपती विसर्जन करावे लागणार आहे.
दगड विटांनी पाण्यावर प्रक्रिया
मेहरुण तलावात सांडपाणी सोडणाऱ्या लोकांचा सर्व्हे करून त्यांना नोटीस बजाविण्यात येणार आहेत. पाचोरा रोडलगत असलेल्या नेहरू नगरमधील वस्तीचे पाणी शिरसोली रोडकडे उंच भाग असल्यामुळे तिकडे जात नसल्याने त्यांनी रस्त्याच्या खालून पाईप टाकून पाणी तलावात सोडले आहे. ते पाणी रस्त्याजवळ खड्डा खोदून तेथून पंपिंग करून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी तलावात सोडले जाणार असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. परंतु त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रसामुग्री उपलब्ध नाही, म्हणून एक खड्डा खोदून त्यात दगड विटांचे तुकडे टाकून त्यात हे सांडपाणी सोडण्यात येईल व त्या दगडांमध्ये पाणी फिल्टर होऊन निघालेले पाणी तलावात सोडण्यात येईल, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले.
व्हिडीओ होतोय व्हायरल
याबाबतचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात परिसरातील गटारींचे सांडपाणी एका पाईपाव्दारे थेट तलावात सोडण्यात येत असल्याचे दिसत आहे. तलावातील जात असलेल्या सांडपाण्यात गणपती विसर्जन करावे का? असा प्रश्नही यात विचारण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर प्रशासनाकडून मेहरूण तलावाची पाहणी करण्यात आली. तसेच आता महापालिकेकडून तलाव परिसरातील नागरिकांचा सर्व्हे करून त्यांना नोटीस देण्यात येणार आहे व त्या नागरिकांना एकत्र करून परिसरात लहान जलशुध्दीकरण प्रकल्प तयार करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात येणार आहेत. तसे न केल्यास त्या रहिवाशांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.