Jalgaon News: मोबाईल हिसकावून तरुणांसह महिलेची दुचाकीने धूम

जळगाव : दोन संशयित तरुणांसह तरुणीने चालकाला मारहाण केली. त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तिघे दुचाकीने सुसाट वेगाने पसार झाले. ही खळबळजनक घटना सोमवारी रात्री १०.३० ते १०.४५ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील ब्रेन हॉस्पिटलजवळ घडली. गुन्हा दाखल होताच जिल्हापेठ पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी घटनास्थळी जावून घटनेची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनीही धाव घेतली.

संशयितांनी केली पैश्यांची मागणी अक्षय विलास शेलार (वय २८, मूळ रा. गाते, ता. रावेर, हमु निमखेडी रोड, जळगाव) हे वाहनावर ड्रायव्हिंग करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अक्षय यांच्या मित्राचा अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांना पाहण्यासाठी ११ रोजी रात्री ते महामार्गाजवळ अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मार्गे दुचाकीने रुग्णालयात जात होते. याठिकाणीं मोहीत चायनीजजवळ एका दुचाकीने दोन तरुण तसेच एक महिला असे तिघे जणांनी येथे अक्षय यांना थांबविले. तुला काही मदत हवी का? अशी तिघा संशयितांनी विचारणा केली. मला काही मदत नको, असे उत्तर अक्षय यांनी दिले. त्यानंतर संशयितांनी त्यांच्याकडे २०० रुपये मागितले. पैसे नसत्याचे अक्षय यांनी सांगितले.

महिलेने केली मारहाण दुचाकीवर संशयितांसोबत आलेल्या यांना चापटांनी महिलेने अक्षय मारहाण करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आत त्याच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून अग्रवाल चौकाकडे दुचाकीने तिघे संशयित पसार झाले. अक्षय शेलार यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जावून आपबिती ठाणे अंमलदारासमोर मांडली. तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. पथकाने घेतले तिघांना ताब्यात तिघा संशयितांची गोपनीय माहिती मिळताच जिल्हापेठचे पोलीस नाईक जुबेर तडवी, पोलीस कॉन्सटेबल अमितकुमार मराठे यांनी माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना दिली. गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्सटेबल सलीम तडवी, पोलीस कॉन्सटेबल मिलिंद सोनवणे, पोलीस कॉन्सटेबल तुषार पाटील, महिला पोलीस कॉन्सटेबल वैशाली सादरे, चालक पोलीस हेड कॉन्सटेबल साहेबराव खैरनार यांना तपासकामी रवाना केले.

पथकाने माहितीच्या आधारे पिंप्राळा हुडको येथे जावून शेख अजरुद्दीन शेख हुस्नोद्दीन ऊर्फ भुतपलीत (वय २८, रा. शाहुनगर पिंप्राळा जळगाव), मंगल सोमा सोनवणे (वय २८, रा. पिंप्राळा हुडको सोमवार ११ रोजी रात्री ताब्यात घेतले. तर या दोघांसोबत असलेल्या २८ वर्षीय संशयित महिलेला मंगळवार १२ रेजी पिंप्राळा हुडको येथुन पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच तरुणाचा हिसकावून घेतलेला मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मंगळवार १२ रोजी तिघा संशयितांना पोलिसांनी हजर केले असता तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास उपनिरीक्षक उल्हास चहाटे करीत आहे.