यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील मोर नदी पात्रात म्हशी बाहेर काढताना तोल गेल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ग्रामस्थांनी नदीत धाव घेत तरुणास पाण्यातून बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अंजाळे, ता. यावल या गावातील रहिवासी सुनील दिलीप बादशाह (३०) या शेतकऱ्याकडे गुरे-ढोरं आहेत. हा तरुण सोमवारी सायंकाळी मोर नदीच्या पात्राजवळ गुरे चराई करीत असताना मोर नदी पात्रात शेळगाव बॅरेजच्या बॅक वॉटरकडे एक म्हैस गेल्याने त्या म्हशीला पाण्यातून बाहेर काढत असतांना अचानक तरुणाचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला. हा प्रकार सोबत असलेल्या गुराख्यांच्या निदर्शनास आला.
त्यांनी ग्रामस्थांना बोलावले असता पोहणाऱ्यांच्या मदतीने सुनील बादशाह याला पाण्यातून त्याला बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भरत बादशहा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, सात महिन्याची मुलगी असा परिवार आहे.