जळगाव : इलेक्ट्रीक वायर्स चोरीच्या संशयातून बेदम मारहाण केल्याने परप्रांतीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. शेतकर्यांनी प्रकरण अंगलट न येण्यासाठी मयताचे कपडे काढून मृतदेह हलवला, मात्र वरणगाव पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली असून, आज भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पंकज रामचंद्र सोनवणे (20, धामणगाव, ता.शहापूर, जि.बर्हाणपूर, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
भुसावळ तालुक्यातील फुलगाव (ता.भुसावळ) शिवारात ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक परशुराम बाबासाहेब दळवी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विजय सुधाकर चौधरी (40), संतोष मुरलिधर कोलते (52)ख अविनाश पुंडलिक पाटील (54), सुपडू उर्फ नरेंद्र यशवंत चौधरी (45, फुलगाव, ता.भुसावळ) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारेख प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, कमलाबर बागुल, अनिल देशमुख, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, दीपक पाटील तसेच वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, पोलीस उपनिरीक्षक परशुराम बाबासाहेब दळवी, नाईक अतुल बोदडे कॉन्स्टेबल सुखराम सावकारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.