पाचोरा : गेल्या दीड वर्षापासून मलेशियात वास्तव्यास असलेल्या पाचोरा येथील सिंधी कॉलनीतील जयकुमार रतनानी (वय 40) या व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचा संशय आहे. 22 ऑक्टोबर 2023 पासून या व्यापाऱ्याशी संपर्क होत नसून त्यांच्याशी बोलण्यासाठी मोबाईलवरून पैशाची मागणी केली जात आहे.याबाबत जिल्हा प्रशासनाने भारतीय उच्च आयोगाच्या समुपदेशकांकडे पाठपुरावा सुरू केला. मलेशियातील भारतीय दूतावास कार्यालयाच्या पाठपुराव्यानंतर मलेशिया पोलिसांनी बेपत्ता जयकुमार यांचा शोध सुरू केला आहे. जळगाव येथील चॉकलेटची फॅक्टरी डबघाईस गेल्यावर जयकुमार हे रोजगारासाठी मलेशियात गेले. 22 ऑक्टोबर 2023 रोजी कार्यक्रमात असल्याचे सांगत त्यांनी बोलणे टाळले. त्यानंतर मात्र त्यांच्याशी संपर्क तुटला. दोन दिवसांनी त्यांच्या पत्नी भाविका यांना अनोळखी दोन क्रमांकावरुन कॉल आले. जयकुमार आमच्या कोठडीत असून, त्यांच्याशी बोलायचे असल्यास बँक खात्यात 5 हजार रुपये टाका, अशी मागणी करण्यात आली. अवांग नारुलहदी असे मोबाइलकर्त्याचे नाव निष्पन्न झाले. भाविका यांनी अनेकदा प्रयत्न करूनही पैसे ट्रान्सफर झाले नाहीत आणि संपर्कही झाला नाही.
दरम्यान, रतनानी परिवाराने खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकरवी मलेशियातील दूतावासाला पत्र धाडले. रतनानी परिवार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनासुध्दा भेटले. प्रसाद यांनी दखल घेत थेट भारतीय उच्च आयोगाच्या समुपदेशकांशी संपर्क केला. मलेशियातील भारतीय दूतावासाने माहिती घेतली असता जयकुमार यांच्यावर कुठेही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट झाले.
जयकुमार सुखरूप घरी परतावा
जयकुमार याने जळगाव, पाचोरा येथे व्यवसायही सुरू केला. मात्र त्यास अपयश आले व तो रोजगारासाठी मलेशियात गेला. जयकुमार यास पत्नी व दोन मुले आहेत. जयकुमारचा दररोज फोन यायचा. मात्र दि.25 ऑक्टोबरनंतर फोन येणे बंद झाल्याने रतनाणी परिवाराची चिंता वाढली. त्यांनी फोनद्वारा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. जयकुमार हा नेमका मलेशियात गेल्या दीड वर्षापासून कुणाकडे कामास होता, कुठं राहत होता हे अद्याप घरच्यांनादेखील माहीत नसल्याने परिवाराच्या चिंतेत वाढ झाली असून, जयकुमार हा सुखरूप घरी परतावा याकडेच रतनाणी परिवाराचे लक्ष लागून आहे.
मलेशिया पोलिसांनी बेपत्ताची नोंद घेऊन जयकुमार यांचा शोध सुरू केला आहे. विदेश राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्याशी खासदारांसह जिल्हा प्रशासनही संपर्कात आहे. नक्कीच प्रयत्न फळास येतील.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव