जळगाव : जिममध्ये व्यायाम केल्यानंतर पाणी पित असताना चक्कर येवून तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला.रोहित जगदीश जाखेटे (वय ४२, रा. लेकसाईट मेहरुण तलाव परिसर) असे मृताचे नाव आहे. गुरुवार, १६ रोजी सकाळी ही घटना घडली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. रोहित जाखेटे हे व्यावसायिक होते. ते नियमितपणे शहरातील एका जीममध्ये सकाळी व्यायाम करण्यासाठी जात असायचे.
आजही त्यांनी जीममध्ये व्यायाम केला. त्यानंतर पाणी पीत असताना ते अत्यवस्थ होवून कोसळले. त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता सकाळी सात वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यांना मृत घोषीत केले. घटना कळताच त्यांच्या नातेवाईकांसह स्नेहीजणांनी रुग्णालयात धाव घेतली. या अकस्मात घटनेने अनेकांना धक्का बसला. कुटुंबियांना शोक अनावर झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पंचनामा करुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
रेल्वे अपघातात तरुण जखमी रेल्वेतून प्रवास करत असताना तरुण जखमी झाला. रेल्वे पोलिसांनी या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी गुरुवार, १६ रोजी दाखल केले. आकाश प्रजापती ( वय १८, इलाहाबाद) असे जखमीचे नाव आहे. आकाश याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा रेल्वे पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. जखमीवर उपचार सुरु आहेत