भुसावळ : भुसावळ शहर पोलीस ठाण्यासमोर व न्यायालयाच्या संरक्षण भिंती बाहेर असलेल्या लिंबाच्या झाडाला एका अनोळखी व्यक्तीने दोरीला गळफास घेतला. ही घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्या करणारा वेडसर !
शहर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या न्यायालयाच्या संरक्षण भिंतीच्या जवळ असलेल्या लिंबांच्या झाडाला तेथील विक्रेत्यांनी बांधलेल्या दोरीचा उपयोग करून अनोळखी व्यक्तीने शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास गळफास घेतला. रात्री या भागात अंधार असल्याने कोणाला दिसले नाही, मात्र गस्तीवरून आलेल्या पोलिसांना दिसताच त्यांनी मृतदेह खाली उतरवित ग्रामीण रूग्णालयात नेला. अनोळखी व्यक्ती असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आत्महत्या करणारा हा वेडसर असल्याचा अंदाज आहे.