jalgaon news: शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात केळीचा होणार समावेश

जळगाव : जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे पोषण आहार दिला जातो. सध्या मेनूप्रमाणे आहार दिला जात असून या मेनूमध्ये केळीचा देखील समावेश व्हावा यासाठी जि.प प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. जि.प. सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीअंकित यांच्याकडून शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठविला जाणार आहे.   शासनाने मान्यता दिंल्यास जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना ‘सुगी’चे दिवस येणार आहे.

विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबतच व्हीटॅमिनयुक्त सकस आहार मिळावा यासाठी पोषण आहारात केळीच्या समावेशासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल उचलले जात आहे. जिल्ह्यात साधारणत: 70 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर केळीची लागवड होत असते.जळगाव जिल्ह्याची जगभर ‘बनाना सिटी’ म्हणून ओळख आहे. निर्यातक्षम केळीचे उत्पादन जिल्ह्यात होत असल्याने त्याची अन्य राज्यात व देशात देखील मोठी मागणी आहे.

दुसरीकडे जि.प शाळांमध्ये पूर्वी दुध, अंडी देखील आहारात दिली जात होती. सध्या मेनू कार्डनुसार पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जात आहे. मात्र त्यात केळीचा समावेश नाही. मुलांना प्रथिने, जीवनसत्व मिळावे यासाठी पोषक असलेल्या केळीचा पोषण आहारात समावेश झाल्यास याचा दुहेरी फायदा होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी हक्काची मोठी बाजारपेठ स्थानिक पातळीवरच निर्माण होणार असल्याने केळी पिकाला ‘अच्छे दिन’येणार आहेत. जिल्ह्याचे प्रमुख पिक असल्याने स्थानिक पातळीवर सहज उपलब्धता होणार असल्याने केळी पिकाचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून पाठपुरावा केला जाणार आहे.

केळी पिकाला फळाचा दर्जा देण्यासाठी पालकमंत्र्यांकडून पाठपुरावा सुरू आहे. केळी महामंडळासाठी जिल्ह्याला 100 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. केळीचा पोषण आहारात समावेश झाल्यास जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तिन्ही मंत्र्यांकडून पाठपुरावा केल्यास केळीचा पोषण आहारात समावेश होण्यास मदत होणार आहे.

जल्ह्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो.सध्या मेनू कार्डनुसार विद्यार्थ्यांना आहार दिला जात आहे. आहारात केळीचा समावेश करण्याबाबत विचार आहे.यासाठी लवकरच शिक्षण विभागाशी चर्चा करून प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल,तसेच पाठपुरावा केला जाईल.

– श्री अंकित   मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प जळगाव