जळगाव : शिष्यवृत्ती परीक्षेच्या उपक्रमासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सोमवारी जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना भेट दिली. त्यात जिल्हा परिषद उर्दू शाळा जामनेर पुरा या शाळेत भेट दिली असता शाळेच्या पटावर 12 विद्यार्थी असून केवळ 2 विद्यार्थी उपस्थित होते.अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाधिकारी यांनी स्वतः भेट दिली. त्यांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी राम लोहार, उर्दू केंद्रप्रमुख मराठी माध्यमाच्या केंद्रप्रमुख श्रीमती सोनवणे उपस्थित होते. सदर विद्यार्थी शाळेकडे उपलब्ध पत्त्यावर आढळून आलेले नाहीत. तसेच त्या पूर्ण वस्तीत हे विद्यार्थी राहत नसल्याचे निदर्शनास आले. या विद्यार्थ्यांच्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांना दिल्या. जिल्हा परिषद मराठी शाळा जामनेर पुरा या शाळेत देखील 30 पैकी 10 विद्यार्थी उपस्थित होते.
या शाळेमध्ये विजेची उपलब्धता दिसून आलेली नाही. मुख्याध्यापक श्रीकृष्ण पाटील यांना तात्काळ विजेची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी दिली. अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालक भेटी दिल्याचे दिसून आले. मात्र पालक भेटी देऊनही विद्यार्थी का? उपस्थित राहत नाही याची कारण व त्यावरील उपाय याबाबत गांभीर्याने विचार करावा. 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी नियोजन करावे व अंमलबजावणी व्हावी अशा सूचना समक्ष देण्यात आल्या.
येत्या आठवड्यात सर्वच शिक्षकांनी सतत गैरहजर राहणाऱ्या मुलांच्या पालक भेटी घ्याव्यात, गृह भेटी घ्याव्यात. विद्यार्थी गावात नसल्यास त्या परिसरात राहत नसल्यास तत्काळ नाव कमी करण्याबाबतची कार्यवाही करावी.
– विकास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प., जळगाव