जळगाव : बडे जटाधारी महादेव मंदिर वडनगरी फाटा परिसरास सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला लाखो भाविक उपस्थित होत आहेत. या गर्दीत महिलांच्या दागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी परप्रांतीय टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कथेच्या गर्दीत एलसीबीचे पथक लक्ष ठेऊन असून गुरुवारी पुन्हा 11 संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची संख्या 38 वर पोहोचली आहे.
कथेत भाविक बनून हे संशयित चोरटे या गर्दीत सामील झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मध्यप्रदेश, राजस्थान तसेच उत्तरप्रदेश येथील सराईत महिलांच्या टोळ्या येथे आलेल्या आहेत. मंगळवार, 5 रोजी पथकाने कथेच्या पहिल्याच दिवशी 27 महिला एक अल्पवयीन तसेच एक संशयित पुरुषाला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार पुन्हा 4 संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यापाठोपाठ गुरुवारी पोलिसांनी तब्बल 11 जणांना ताब्यात घेतले. यात राजस्थानातील पाच महिला तसेच मध्यप्रदेश इंदर येथील 5 महिलांचा समावेश आहे. एक संशयित पुरुष मध्यप्रदेशातील आहे. त्यामुळे संशयित चोरट्यांची संख्या 38 वर पोहोचली असून हा आकडा वाढू शकतो. या 11 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना शनिवार, 9 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.