Jalgaon News : शेतकऱ्याची विहिरीत… तर प्रौढाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या; काय आहे कारण ?

जळगाव : भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाडा येथे राहणाऱ्या एका प्रौढाने आजाराला कंटाळून तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. तर सावखेडा सीम (ता.यावल) येथे एका कर्जबाजारी शेतकर्‍याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाडा येथे राहणाऱ्या योगेश जगदीश सपकाळे याने आजाराला कंटाळून  तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार, १० रोजी दुपारी १२ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय कंखरे करीत आहेत.

दुसरी घटना यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार , येथील शेतकरी अनिल प्रकाश पाटील यांच्यावर अडीच लाखापर्यंत कर्ज झालेले होते. यामुळे ते नैराश्यात होते. दरम्यान, २ जूनपासून घरात कोणाला काही न सांगता ते बेपत्ता झालेले होते, अशी माहिती देण्यात आली. कादर मोहम्मद तडवी यांचे शेतातील विहिरीत अनिल पाटील हे मृत अवस्थेत आढळून आले.

मोहम्मद तडवी हे त्यांचे शेतातील गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेले विजपंप सुरू करण्यास गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी आली. त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता अनिल पाटील यांचे प्रेत आढळून आले. ही खबर पोलीस पाटील,पंकज बडगुजर यांना दिली असता त्यांनी यावल पोलिसात कळविले.

यानुसार यावल पोलिसांनी त्यांचा मृतदेह विहिरी बाहेर काढून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉप्रशांत जावळे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हेड कॉंस्टेबल राजेंद्र पवार,वसीम तडवी आणि सहकारी करीत आहेत.