Jalgaon News : सुट्टीवर आलेला जवान अचानक बेपत्ता

जळगाव : पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील सैन्य दलात कार्यरत असलेला २३ वर्षीय जवान बेपत्ता झाल्याची खबर जवानाच्या वडिलांनी दिली. त्यानुसार पाचोरा पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद  करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, सावखेडा ता. पाचोरा येथील करण समाधान तडवी (२३) जैसलमेर (राजस्थान) येथे सेवेवर आहे. करण तडवी हे सुट्टी घेवुन सावखेडा येथे आला होते. दरम्यान सुट्टी संपली असल्याने १२ नोव्हेंबर रोजी करण तडवी यांना वडिल समाधान शिलेमान तडवी यांनी पाचोरा येथील जारगाव चौफुलीवरुन सुरत जाणाऱ्या लक्झरी बस मध्ये बसविले होते.

मात्र १० दिवस उलटून ही करण तडवी हे जवान जैसलमेर येथे पोहचले नाही. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता मिळुन न आल्याने वडील समाधान तडवी यांच्या खबरीवरुन २४ नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलिस ठाण्यात करण तडवी हे हरविल्याची नोंद करण्यात आली असून, पुढील शोध पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहेत.