जळगाव: जळगाव मतदारसंघातील लोकसभा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज त्यांच्या नावाने सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एक पोस्ट व्हायरल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब निदर्शनास येताच वाघ यांनी तीव्र नाराजी केली.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला असून स्मिता वाघ यांचे पारडे जड मानले जात आहे. अशातच प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या काही तास आधी, ‘खासदार झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणार’ अशी पोस्ट करून त्यावर एका न्यूज चॅनलचा लोगो व वाघ यांचा फोटो वापरला आहे. हा खोडसाळपणा समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मंत्री गिरीश म हाजन, स्मिता वाघ, भाजपसह संपूर्ण मराठा समाजातर्फे या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
स्मिता वाघ म्हणाल्या की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण जीवनात पाळणारे आहोत. शिवछत्रपतींच्या काळात महिलांना सन्मान मिळत होता. मात्र आता काही विरोधक महिलांच्या नावाने असे प्रकार करून महिलांचा अपमान करीत आहेत. मराठा समाजाबद्दल अशी आक्षेपार्ह करून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्याविरोधात षड्यंत्र रचून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोतच, असे स्मिता वाघ यांनी स्पष्ट केले.
गिरीश महाजन म्हणाले की, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे. यामुळे समाजांम ध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. त्यांना सुज्ञ मतदार त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाज आपच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. हे विरोधकांना पाहिले जात नाही, यामुळेच त्यांनी असे खालच्या दर्जाचे राजकारण केले असल्याचा
आरोप ना. महाजन यांनी केला
आहे.