सर फोन पे वर लवकर क्लिक करा. आपणास फोनपे कंपनीतर्फे कॅशबॅक दिला जात आहे. आपल्या रकमेचा शंभरपट फायदा होत आहे, पुन्हा अशी संधी नाही येणार, विम्याचा जास्त परतावा मिळवून देतो, अशा प्रकारच्या भुलथापा देत सायबर गुन्हेगार लोकांना लाखो रुपयांना चुना लावत आहेत. जिल्ह्यात गत पाच महिन्यात सायबर गुन्हेगारांनी जनतेच्या खात्यातील तब्बल 66 लाखाहून अधिक रक्कम लांबविली आहे.
ग्राहकांचे बँक खात्यातील पैसे हडपण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकारचा फंडा वापरून ग्राहकांच्या मनात त्यांची स्किम ठसवतात. ग्राहकांना प्रलोभन दाखवून ऑनलाईन फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल होत आहेत.आर्थिक फसवणूक करण्यासाठी हे ठग ग्राहकांशी खूप आपुलकीने संवाद साधून खोट्या योजना खर्या असल्याचे भासवितात. तुमची आणि तुमच्या पैशांची ते खूप काळजी घेतात, अशाच पध्दतीचा बनाव करत ते लोकांचा विश्वास मिळवितात. गुंतवणूक केलेल्या रकमेत सुरुवातीला जास्तीचा फायदा करून देतात. जास्त रकमेवर जास्त म्हणजे शंभरपट फायदा उचलण्याचा ते आग्रह धरतात. त्यानंतर आयडी माहिती घेत बँक खात्यातील बॅलेन्स ऑनलाईन वळवून घेतात. अशी फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली गोपनीय माहिती कोणालाही आणि कुठेही शेअर करू नये, असे आवाहन सायबर
भुलथापांना बळी पडू नका
कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून प्राप्त ऑनलाईन फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक व बँकेसंबंधी माहिती भरू नये अथवा फोन कॉलव्दारे देवू नये. लॉटरी, बक्षीस लागल्याचे कॉल, एसएमएस व कॉल आल्यास अशा भूलथापांना बळी पडू नये. ऑनलाईन शॉपिंग करताना अधिकृत व सुरक्षित वेबसाईट किंवा अॅपचा वापर करावा.ओएलएक्सव्दारे खरेदी विक्रीचे व्यवहार, एमएसईबी लाईट कट करणे, ऑनलाईन अॅप लोन,अनोळखी व्हिडिओ कॉल, अनोळखी व्यक्ती, ऑनलाईन मैत्री, अॅनी डेक्स, क्विक शेअर, क्विक सपोर्ट, टिम विव्हर, एसएमएस फॉरवर्डींग अॅपस अशा विविध माध्यमातून फसवणूक करण्यात येते. ग्राहकांनी सायबर गुन्हे टाळण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
राज्यात लवकरच सायबर गुप्तचर सेलची स्थापना
सायबर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे. सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी तसेच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्यात अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म स्थापन केला जात असून सहा महिन्यात कार्यान्वित होईल. सायबर गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी राज्यात 43 सायबर प्रयोगशाळा आहेत. सायबर गुप्तचर सेल स्थापन करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल. तसेच तपासाला परिणामकारक गती प्राप्त होईल. बाह्य यंत्रणेच्या मदतीने एक मॉडेलही तयार केले जात आहे. प्रशिक्षण वर्गही कार्यान्वित केला जात आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पाच महिन्यात खातेदारांना 66 लाखांचा गंडा
जळगाव जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी अनेक लोकांचे बँकखाते रिकामे केले. मे महिन्यापासून ते ऑगस्ट 2023 या पाच महिन्यात ग्राहकांना कसा चुना लावला, त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
25 एप्रिल………….15 लाख 35 हजार
22 मे………………04 लाख 11 हजार
07 जुलै……………10 लाख 42 हजार
09 जुलै……………10 लाख 41 हजार
20 जुलै……………5 लाख 29 हजार
28 जुलै……………12 लाख 85 हजार
29 जुलै……………8 लाख 21 हजार
06 ऑगस्ट………..8 लाख 55 हजार