Jalgaon News: भाजप केमिस्ट फार्मासिस्ट आघाडी प्रदेश सहसंयोजकपदी सुनील भंगाळे

भाजप केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत प्रदेश सहसंयोजकपदी सुनील रामदास भंगाळे, तर उत्तर महाराष्ट्र विभागीय सहसंयोजकपदी संजय प्रभाकर नारखेडे आणि दशरथ वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भाजप केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यात जळगाव जिल्हा मेडिकल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांची प्रदेश कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.

भंगाळे केमिस्ट असोसिएशनचे सात वेळा अध्यक्ष

सुनील भंगाळे यांचा औषधी व्यवसायासोबतच विविध संस्थांमध्ये सहभाग राहिला आहे. 2005 पासून केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पद त्यांनी याआधी सात वेळा भुषविले आहे. यासोबतच विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सांगली येेथील स्वदेशी ट्रस्टचा महाराष्ट्र केमिस्ट भूषण, गायत्री परिवाराचा समाजसेवा पुरस्कार, ईद मिलन समितीतर्फे शहेनशाह-ए-केमिस्ट आदी पुरस्कारांचा समावेश आहे. 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपानंतर बाधितांना औषधी व आर्थिक मदत केली आहे. याशिवाय दोन शाळांची उभारणी त्यांनी केली आहे.

कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान गरजूंना अन्नधान्य वाटप, मार्गावरून येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांना भोजन व्यवस्था, सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोव्हज यांचे वेगवेगळ्या संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी कार्यालयांमध्ये वाटप केले आहे. यासोबत विविध सेवाभावी उपक्रमांमध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.

नारखेडे यांचा विविध प्रकल्पांमध्ये सहभाग

उत्तर महाराष्ट्र विभागीय सहसंयोजकपदी निवड झालेले संजय प्रभाकर नारखेडे जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनमध्ये 2010 पासून संचालक पदाची धुरा सांभाळत आहेत. यासोबतच केशवस्मृती सेवासंस्था समूहाच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग आहे. सध्या ते ‘जळगाव तरुण भारत’चे सहप्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय रक्तदान चळवळ वाढीत त्यांचा पुढाकार असतो. याशिवाय विविध उपक्रमांमध्ये त्यांनी कार्य केले आहे.