---Advertisement---
जळगाव: 80 गुरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुरांच्या लसीकरणाला वेग आला आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर व धरणगाव या 7 तालुक्यातील 78 ठिकाणी गुरांमध्ये सांसर्गिक लम्पी आजाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे या तालुक्यातील सर्व गुरांचा आठवडे बाजार हा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत
या तालुक्यातील जनावरे लम्पी साथ रोगाने बाधित जनावरे आढळून आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर भागातील निरोगी पशुधनास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रोग विषाणुजन्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ अंमलात आणण्यासाठी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार गुरांची खरेदी विक्रीसाठी या 7 तालुक्यातील गुरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद राहणार आहेत.
जिल्ह्यातील वरील 7 बाधित तालुक्यात पशुधन एकत्र येतील असे सार्वजनीक चराई व सार्वजनिक गुरांसाठीचे पाणी पिण्याचे सार्वजनिक हौद पुढील 15 दिवस बंद ठेवण्यात यावे. सदर रोगाचा प्रसार बाह्य किटकांव्दारे (डास, माशा, गोचिड, इत्यादी) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व गुरांवर तसेच गोठयात बाह्य किटकांच्या निर्मुलनासाठी ग्रामपंचायतीनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधांची फवारणी करावी. बाधित परिसरात गोठा स्वच्छता तसे निवारणी करावी. ग्रामपंचायतीनी पशुधन मृत झाल्यास त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी 4 बाय 8 फुट आकाराचे खड्डे करण्याची व्यवस्था करावी. सदर व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर शक्य नसल्यास गटविकास अधिकारी यांच्यामार्फत बांधकाम विभाग पंचायत समिती किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे करण्याची व्यवस्था करावी. पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पध्दतीने मृत पशुधनाची विल्हेवाट लावावी.
सर्व खाजगी पदविकाधारक यांनी पशुपालकांनी लम्पी आजाराची माहिती शासकिय पशुवैद्यकिय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी आजाराच्या पशुधनाचे उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसारच करण्यात यावे. खाजगी पदविकाधारक यांनी परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सर्व पशुवैद्यकिय संस्थांनी उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करून उपलब्ध करून घेण्यात याव्यात, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अंतरजिल्हा आंतरराज्य वाहतूक बंद
जिल्ह्यात इतर राज्यामधून आंतरराज्य, आंतरजिल्हा व आंतरतालुका पशुधनाची होणारी वाहतूक बंद ठेवण्यात यावी. त्याकरिता जिल्हा पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी आंतरराज्य सीमेवरील चेक नाक्यावर कसून तपासणी करावी. ज्या गुरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून 28 दिवस पूर्ण झालेले आहे, त्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केल्यास वाहतुकीस परवानगी असेल.









