---Advertisement---

Jalgaon News : मनपा निवडणुकीसाठी समिती गठित होणार, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक

---Advertisement---

Jalgaon News : जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार ते पाच जणांची समिती गठित होणार आहे. ही समिती प्रभाग रचनेपासून ते निवडणूक होईपर्यंतचे कामकाज करणार आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांचा बिगुल येत्या काही दिवसात वाजण्याची शक्यता आहे. शासनाने मंगळवारी राज्यातील महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जळगाव महापालिकेचीही निवडणूक प्रस्तावित असल्याने शासनाने मनपा प्रशासनाला प्रभाग रचनेसंबंधीच्या सूचना केल्या आहेत.

मनपात प्राथमिक बैठक

मनपा निवडणुकीच्या दृष्टीने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य शासनाने प्रभाग रचनेसंबंधी दिलेल्या सूचनांचे वाचन करण्यात आले. तसेच महापालिका निवडणुकीसाठी चार ते पाच जणांची समिती आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या समितीत नगररचना अधिकारी, उपायुक्त, संगणकीयतज्ज्ञ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

२०११ ची जनगणना ग्राह्य धरणार

राज्य शासनाने सूचित केल्यानुसार लगतची जनगणना या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे २०२५ च्याही निवडणुकीत प्रभाग रचना आणि सदस्य संख्या यात फारसा बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान राज्य शासनाकडून ज्याप्रमाणे आदेश येतील त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे.

१९ प्रभाग ७५ सदस्य

सन २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत २०११ च्या जनगणनेनुसार १९ प्रभाग आणि ७५ सदस्य अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. यंदाही ही संख्या कायम राहण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

राजकीय धावपळ सुरू

राज्य शासनाने महापालिकांना प्रभाग रचनेसंबंधीचे आदेश देताच राजकीय पक्षांचीही धावपळ सुरू झाली आहे. मागील प्रभाग रचना, सदस्य संख्या, सध्याची वाढीव लोकसंख्या आणि मतदार या संबंधीची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून घेतली जात आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment