जळगाव : घराच्या वरच्या रुमवर जावून येतो, असे कुटुंबातील सदस्यांना सांगत घरातील वरच्या मजल्यावर जावून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवार 5 रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील सम्राट कॉलनीत घडली. सुनील मधुकर चौधरी (35) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील चौधरी हे मुळ विरवाडे (ता.चोपडा) येथील रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते सम्राट कॉलनीत पत्नी वैशाली, मुलगा कृष्णा (7),लहान मुलगा सोनू (4) असे वास्तव्यास आहेत.ते शहरातील बोहरा गल्लीत एका हार्डवेअरच्या दुकानावर कार्यरत होते.
सकाळी 8.30 वाजता सुनील यांनी त्यांच्या मोबाईलवरुन शहरात वास्तव्यास असलेले त्यांचे मावसभाऊ भूषण चौधरी यांच्याशी संपर्क साधून गप्पा केल्या. त्यानंतर पत्नी, मुले यांच्याशीही त्यांनी नेहमीसारखा संवाद साधला. वरच्या रुमवरुन येतो, असे कुटुंबियांना सांगून ते वरच्या मजल्यावर गेले. याठिकाणी एकातंवासात त्यांनी गळफास लावला. त्यांच्या पत्नी वरच्या मजल्यावर गेल्या असता त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर प्रकार समोर आला. घटना कळताच नातेवाईक तसेच त्यांच्या मित्रांनी त्यांच्या घरी धाव घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.