jalgaon news : भावी डॉक्टर नैराश्येच्या गर्तेत

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्युनिअर (कनिष्ठ निवासी) हे विद्यार्थी रुग्णालयात प्रॅक्टीस करतात. ते ओपीडीमध्ये रुग्णसेवा देतात. याशिवाय त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यासही करावा लागत असतो. ते २४ तास सेवेसाठी बांधिल असतात. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडू शकतो. मनाला जडलेला हा आजार समुपदेशन व उपचारातून हमखास चांगला होऊ शकतो.येथील आदिनाथ संजय पाटील हा मुंबईच्या केईएम हॉस्पिटल येथे पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत होता. हॉस्पिटलमध्ये क्षयरोग विभागात ड्यूटी बजावताना सोमवार, १ रोजी सकाळी त्याने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. नैराश्यातून आदिनाथ याने टोकाचा निर्णय घेतल्याचा तर्क लावला जात आहे.

होय, आमची ड्युटी २४ तास
महाविद्यालयातील कनिष्ठ निवासी विद्यार्थ्यांना रुग्णालयात २४ तास ड्युटी असते. कॉलनुसार तत्पर हजर व्हावे लागते. रुग्णसेवा द्यावी लागते. काही अत्यावश्यक सेवादेखील बजवावी लागते. दाखल झालेल्या रूग्णाची रोज तपासणी, एक्सरे, औषधी हे द्यावे लागते. याशिवाय अभ्यासक्रमही पूर्ण करावा लागतो. यामुळे झोप होत नाही. विश्रांती मिळत नाही. तेव्हा मनाची बैचेन अवस्था होते.

ड्युटी बजावत असणार्‍या निवासी विद्यार्थ्यांना त्या विभाग प्रमुखाच्या सूचनांचे पालन करावे लागते. नेहमी रात्रीच ड्युटी लावली तर ती करावी लागते. एखाद्यास दिवसा ड्युटी हवी असल्यास त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे. आवश्यकतेनुसार रजा मागितल्यास नकार देणे किंवा वागणुकीत भेद करणे अशा वरिष्ठांच्या वर्तणुकीनेही मनात वाईट भावना निर्माण होत असल्याचे काही कनिष्ठ निवासी विद्यार्थ्यांनी सांगितले.

अशी आहेत लक्षणे
उदास वाटणे, रडू येणे, मन हळवे होणे, कोणाशी संवाद न साधणे, एकटे राहणे, कामात लक्ष न लागणे, आपल्याला यातून कोणीच सोडवू शकत नाही,अशी भावना निर्माण होणे, खूप लवकर थकवा येणे, खूप झोप लागणे, किंवा झोप कमी होणे, खूप भूक लागणे किंवा कमी होणे ही लक्षणे मानसिक नैराश्यांची आहेत.