राज्य शासनाच्या हायब्रीड अॅन्युटी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले हे रस्ते केवळ वाहतुकीचे साधन नसून गावाचा आत्मविश्वास वाढवणारे माध्यम आहेत. ‘रस्ते म्हणजे विकासाची रक्तवाहिनी असून, हे रस्ते स्थानिक जनतेसाठी वरदान ठरणार आहेत. ते विकासाच्या नव्या युगाची नांदी ठरतील. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणारे रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून, हायब्रीड अॅन्युटी योजनेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी रस्त्यांचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे, असा स्पष्ट इशारा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
ममुराबाद-विदगाव-किनगाव आणि नशिराबाद ते सुनसगाव मार्गावरील काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या हायब्रीड अॅन्युटी योजनेअंतर्गत मागील वर्षी मार्च महिन्यात जळगाव जिल्ह्यात ४३८ किमीचे काँक्रीट रस्ते मंजूर करण्यात आले असून, यासाठी तब्बल १९६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे उपस्थित होते.
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे म्हणाले, जनतेचे आशीर्वाद कधीही विसरणार नसून गाव तिथे विकास केला जात आहे. या भागातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि सामान्य नागरिकांना आता जलद, सुरक्षित आणि सुलभ दळण वळणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पुढील १० वर्षांपर्यंत त्याची देखभाल व दुरुस्तीही ठेकेदाराकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता कायम राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे मंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार लता सोनवणे, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांचे आभार या वेळी मान्यवरांनी मानले.
या वेळी ममुराबाद ते विदगाव ते किनगाव या ४२ किमी रस्त्याचे १०१ कोटी रुपयांचे आणि नशिराबाद ते सुनसगाव ५ किमी रस्त्याचे २० कोटी रुपयांचे भूमिपूजन करण्यात आले असून, एकूण १२१ कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी खर्ची पडणार आहे. कार्यकारी अभियंता शेख इब्राहिम, ना. गुलाबराव पाटील, माजी आमदार लता सोनवणे व आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या हायब्रीड अॅन्युटी योजनेअंतर्गत मागील वर्षी मार्च महिन्यात या भागातील रस्त्यांचे काम मंजूर करण्यात आले होते. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील व निवेदिका सरिता खाचणे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर सावळे यांनी मानले. प्रास्ताविक किरण पाटील व अजय पाटील यांनी केले.
या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नरेंद्र पाटील, मार्केट कमिटी सभापती सुभाष सोळुंके, अविनाश पाटील, बबलू कोळी, सूर्यभान पाटील, चंद्रशेखर पाटील, देविदास पाटील, छोटू पाटील, दीपक पाटील. गोकुळ सोनवणे, दिनू माळी, जि. प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, शहरप्रमुख विकास धनगर, युवासेनेचे चेतन बन्हाटे, ममुराबाद येथील माजी सभापती जनाप्पा कोळी, महेश चौधरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Jalgaon News :विकासाच्या दिशेने मजबूत पाऊल, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘काँक्रीट रस्ता विकास प्रकल्पाचे’ भूमिपूजन
by team
Published On: एप्रिल 13, 2025 12:07 pm

---Advertisement---