भुसावळ : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने महसूल पथकाच्या वाहनाला धडक कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना ११ रात्री ११ वाजेच्या सुमारास फुलगाव शिवारात घडली. याप्रकरणी डंपर व मोटार सायकल चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू वाहतूकदारांची मुजोरी थांबेना जळगावकडून भुसावळकडे येत असताना पिवळ्या रंगाचे डंपर (एम. एच.१९ झेड.४६६९) तपासणी कामी थांबवले असता वाहन चालकाने वाहन न थांबवता वाहन पळून नेण्याचा प्रयत्न केला.
साकेगाववरून बोहर्डी फाटा ब्रीजखाली वळवून पुन्हा जळगावच्या दिशेने वळवून डंपर जळगाव तालुक्यातील कडगावपर्यंत जवळपास ५० किलोमीटरचा पाठलाग करून वरणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने वाहन पकडण्यात यश आले. यावेळी वाहन चालकाने कडगाव शिवारातील दादरच्या शेतात उभ्या पिकात १४ हजार रुपये किंमतीची वाळू खाली करीत अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडून पळ काढला. दुसऱ्या वाहन चालकाची मदत घेऊन डंपर वाहन पथकाने ताब्यात घेऊन जप्त केले. डंपर वरील चालकाने कडगाव येथील शेतकऱ्याच्या दादरच्या शेतीत डंपर घालून पिकाचे नुकसान केल्याने हा शेतकरी सुध्दा चालकाविरूध्द वेगळी फिर्याद देणार आहे. थेट गुन्हे दाखल होणार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालक याच्या विरूध्द कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अवैध गौण खनिज वाहतूक कायद्यांतर्गत दंडाची कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असे तहसीलदार निता लबडे यांनी सांगितले.
महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न
महसूल कर्मचारी वाहन थांबवित असताना महसूल पथकातील कर्मचारी यांच्या अंगावरती डंपर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तर तहसीलदारांच्या पथकारातील वॅगन आर वाहनाला धडक देवून पाच हजारांचे नुकसान करण्यात आले. मंडळाधिकारी रजनी तायडे, चालक फिरोज खान सिकंदर खान, वराडसीम तलाठी नितीन केले, कठोरा तलाठी मिलिंद तायडे, साकेगाव कोतवाल जितेश चौधरी यांच्यावर अंगावर संशयिताने डंपर आणून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वरणगाव मंडळाधिकारी रजनी तायडे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी डंपर चालक एम.एच.१९ झेड.४६७९ व अनोळखी मोटरसायकल (एम.एच.१९ डी.डब्ल्यू. ५९५०) वरील चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.