jalgaon news: जिल्ह्यात दुधात भेसळ करणाऱ्यांवर धडक कारवाई 8 डेअरींमधील भेसळयुक्त दूध नष्ट

जळगाव : जिल्ह्यातील दुधात व दूग्धजन्य पदार्थामध्ये भेसळीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या भेसळीला पायबंद घालण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या माध्यमातून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंंतर्गत जिल्ह्यातील विविध डेअरींवर दूध भेसळ व वजनमापनाचे खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली आहे.

या समितीत अपर पोलीस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व वैध मापनशास्त्र उपनियंत्रक हे सदस्य तर जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत.

दूध संस्था, संकलन केंद्र, प्रोसेसिंग प्रकल्प, दूध व दूग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे, निर्मिती करणारे, विक्री करणारे, स्विट मार्ट, इतर सबंधित उद्योजक यांच्या तपासण्या धडक मोहिमेत करण्यात येतील. या समितीमार्फत 1 सप्टेंबर रोजी चाळीसगाव येथे 8 डेअरीच्या तपासणीअंती भेसळयुक्त दुध नष्ट करण्यात आले. तर 4 डेअरी आस्थापनांवर वजनमापे विभागाव्दारा खटले दाखल करण्यात आलेत. अन्न व औषध प्रशासनाकडून एक सॅम्पल तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आलेले आहे. जनावरांच्या गोठ्यात अनधिकृत ऑक्सीटोसीनचा वापर आढळल्याने पशुसंवर्धन खात्यामार्फत नाशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

5 सप्टेंबर रोजीच्या धडक तपासणी मोहिमेत एरंडोल येथे 3 वजनमाप खटले दाखल करण्यात आलेले असून 22 लिटर भेसळयुक्त दुध नष्ट करून, 2 सॅम्पल्स अन्न व औषध प्रशासनाकडून लॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.

दूध व दूग्धजन्य पदार्थांचे उत्पादक, दूध संकलक, विक्रेते यांनी  संकलन व विक्री करीत असलेले दूध व दूग्धजन्य पदार्थ हे उच्च गुणप्रतीचे व भेसळविरहित असले पाहिजे व सदर पदार्थाच्या वापराच्या मुदतीचा दिनांक अशा दूध व दूग्धजन्य पदार्थाच्या पॅकेट्सवर/ डब्यांवर स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. मुदतबाह्य दूध व दूग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवू नये. समितीमार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये दोषी आढळून आल्यास संबंधितांवर लगेचच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व नियमन 2011 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ आढळल्यास जनतेने समितीस तक्रार दाखल करण्याचे आवाहनही समितीमार्फत करण्यात आले आहे.