जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विवाहित तरुणाची बारामती जिल्ह्यातील विवाहित तरुणीशी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. संवादातून दोघांचे प्रेम बहरले. त्यानंतर चार वर्षीय बालकाला सोबत घेत विवाहित महिलेने प्रियकराचे एरंडोल येथील गाव गाठले. दोघा कुटुंबीयांनी या विवाहबाह्य प्रेम विवाहाला विरोध केला. त्यानंतर या प्रेमीयुगुलाने बालकाला सोबत घेत सोमवारी (५ मे) पाचोरा-परधाडे दरम्यान लोहमार्गावर धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी मृत तरुणाची, तर संध्याकाळी उशिरा मृत तरुणीची ओळख पोलिसांनी पटविली. त्यानंतर या आत्महत्येचे गूढ उकलले.
राजेंद्र निंबा मोरे (वय २२, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा), राधिका ठाकरे (वय २५). सारंग ठाकरे (वय ४ वर्ष, दोन्ही रा. बारामती) अशी मृतांची नावे आहेत. पाचोरा ते पस्थाडे दरम्यान रेल्वे किलोमीटर खांब क्रमांक ३७६/१९ जवळ सोमवारी (५ मे) रात्री ही घटना घडली. मात्र तिघांची ओळख न पटल्याने पाचोरा पोलिसांनी तपासाला गती दिली होती.
अयोध्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना खबर दिली की, पाचोरा ते परधाडे दरम्यान रेल्वे किलोमीटर खांब क्रमांक ३७६/१९ जवळ एक महिला, पुरुष आणि लहान मुलगा रेल्वे पटरीवरून चालत येत असताना धावत्या गाडीसमोर आले आणि ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच, साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, हवालदार राहुल शिंपी, मनोहर पाटील, अशोक हटकर, समाधान भोसले यांनी रुग्णवाहिकासह घटनास्थळी धाव घेतली.
छिन्नविछिन्न अवस्थेतील तिघांचे मृतदेह पोलिसांनी उचलून रुग्णवाहिकेत टाकत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. रात्री मृत तरुण हा राजेंद्र मोरे असून तो भातखंडे येथील असल्याची ओळख पोलिसांनी पटविली होती. मंगळवारी (६ मे) रोजी पोलिसांनी उर्वरित दोघा मयतांची ओळख पटविण्याच्या तपासाला गती दिली असता सायंकाळी महिला आणि बालकाची ओळख पटली.
महिला बारामती जिल्ह्यातील असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्याबरोबरच तिघांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात येत होती. बारामती पोलिसांशी पाचोरा पोलिसांनी संपर्क साधून मृत महिलेबद्दल माहिती दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.