jalgaon news: अरेच्च्या… एकाच कामाच्या निघाल्या दोन निविद

जळगाव :  येथील रामेश्वर कॉलनीतील रस्ते व गटारींच्या कामासाठी महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग अशा दोघांनी निविदा काढल्या आहेत. मात्र एकाकडूनही अद्याप कामास सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांनी शुक्रवारी रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. दरम्यान आमदार सुरेश भोळे यांनीही नागरिकांसोबत रस्त्यावर बसून निवेदन घेतले. रामेश्वर कॉलनीतील रस्ते व गटारींच्या कामासाठी महापालिकेने उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 कोटीतून तर पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी डीपीसीडीतून दिलेल्या 2 कोटीतून सार्वजनिक बांधकाम विभाग अशा दोघांनी निविदा काढल्या आहेत. एकाच कामासाठी दोन निविदा निघाल्या आहेत. मात्र एकाही निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही.

अन्‌‍ नागरिक बसले रस्त्यावर
एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या संस्थानी निविदा काढल्याने मक्तेदारांनी त्या भरल्यात. मात्र अजुन महापालिका व बांधकाम विभागाने त्याची प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. परिणामी रामेश्वर कॉलनीतील नागरीकांना रस्ते व गटारींच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. थोड्याशाही पावसाने गटारी तुडूंब भरून त्याचे पाणी घरात घुसत असते. तर रस्त्याने चालणेेही कठिण होत असते. या त्रासाला कंटाळत नागरीकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला.
आमदारांनीही खाली बसून घेतले निवेदन
दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी आंदोलन स्थळी जात आंदोलनकर्त्यांमध्ये खाली बसून चर्चा केली. त्यांचे म्हणणे समजावून घेत निवेदन घेतले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र घुगे पाटील, आशुतोष पाटील यांच्यासह अनेक नागरिक व महिला उपस्थित होते.

कागदपत्रे तपासून ठरवणार : प्रशासक
याबाबत महापालिकेच्या प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत कागदपत्रे पाहून ठरवणार असल्याचे सांगितले.

काम नेमके करणार कोण ?
सध्या शहरातील विविध कामे हे विभागली गेली आहेत. काही कामे महापालिका करत आहे तर काही कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली आहेत. काही कामे ही मनपा व बांधकाम विभाग असे दोघेही करत असल्याचे चित्र दिसत आहे. या दोघांमध्ये योग्य समन्वय नसल्याने एकाच कामाच्या दोन निविदा निघत आहेत. त्यामुळे काम करणार तरी कोण आणि कधी, असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित होत आहे.