Jalgaon News : रामानंदनगर पोलिसांच्या कारवाईत ३४ लाखांच्या चोरीचा उलगडा

---Advertisement---

 

Jalgaon News : संशयितरित्या वावरणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांनी साथीदारांच्या मदतीने दोन घरफोडी, एक चोरी केल्याची कबुली दिली. रामानंदनगर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३१० ग्रॅम सोने तसेच २५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू, एक दुचाकी असा सुमारे ३४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी (२६ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

१९ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलीस पेट्रोलिंग करत होते. तेव्हा दोन तरुण संशयितरित्या वावरत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. या दोघांना ताब्यात घेतले असता या दोघांवर यापूर्वी दोन गुन्हे पोलीस डायरीत नोंद असल्याची माहिती समोर आली. रवि प्रकाश चव्हाण (वय २१ वर्ष, रा. तांबापुरा), शेख शकील शेख रफिक (वय ३९, रा. मौलीगंज धुळे, सालारनगर) अशी या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दोघांची कसुन चौकशी केली असता अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दोन घरफोड्या तसेच एक चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने तपास चक्र फिरवून या दोघांचे साथीदारा जुनेद उर्फ मुस्तकीम भिकन शहा (रा. मच्छीबाजार, तांबापुरा, मशीदजवळ शिरसोली), गुरुदयालसिंग मनजित टाक (रा. तांबापुरा शिरसोली नाका) यांना अटक केली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या तीन गुन्ह्यांची या कारवाईतून उकल झाली.

लिलाधर शांताराम खंबायत (रा. न्यु पार्वतीबाई काळेनगर, मोहाडी रोड) यांच्या बंद घरातून सोने चांदीचे दागिने, रोकड असा एकुण ३५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणी १ जून २०२५ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनात रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस शिपाई अनिल सोननी, नितेश बच्छाव, चालक हवालदार प्रमोद पाटील, हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, पोलीस नाईक योगेश बारी, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, पोशि अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटील, दीपक वंजारी यांच्या पथकानी ही कारवाई केली.

चोरीचे दागिने सुरत – जामनेर येथे विक्री

रामानंदगर हद्दीतून चोरलेले सोने चांदीचे दागिने संशयितांनी सुरत तसेच जामनेर येथे विकले, अशी कबुली संशयितांनी पोलिसांना दिली. दुचाकीची चोरी समतानगर येथुन केल्याची कबुली दिली. रामानंदनगर पोलिसांनी तपास चक्र फिरवून सुरत व जामनेर येथुन एकुण ३३,७९ हजार रुपये किमतीची ३१० ग्रॅम सोन्याची लगड तसेच २५ हजार किमतीची २५० ग्रॅम चांदीची लगड, ४५ हजार किमतीची दुचाकी (एमएच १९ बीडब्ल्यू९१४४) असा एकुण ३४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळाले.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---