Jalgaon News : एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

जळगाव : एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ या व इतर मागण्यांसाठी विभागीय कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांनी आज रविवारी गेट समोर काळयाफिती लावून आंदोलन केले, याप्रसंगी सर्व संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.  याप्रसंगी “अहो नाथांचे नाथ.. आम्हाला करू नका अनाथ..” अशी याचना मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये लाडक्या बहिणी, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक व विविध सवलत धारक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्याचे काम महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी रात्रंदिवस करीत आहे. विविध खात्यांची पगार वाढ झाल्यानंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांशी दुजाभाव करण्यात येत असल्यामुळे येत्या 2 दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल असा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला.

यावेळी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले तर सोमवारी आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. तरी देखील प्रशासनाने दखल न घेतल्यास मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे संयोजक गोपाळ पाटील यांनी दिली.

आगामी अत्यंत महत्त्वाचा असल्याने कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली एकजूटता कायम ठेवून आपला हक्क मागून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विलास सोनवणे यांनी केले.

रा. प. कामगार प्रलंबित आर्थिक प्रश्नांच्या मागण्याबाबत राज्य शासनाकडून वेळकाढू पणा होत असल्याबाबत प्रशांत चौधरी यांनी निषेधाचा ठराव ठेवला.

पाऊस सुरू असताना देखील जळगाव विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी बंधू व भगिनी यांनी काळ्या फिती लावून सरकारला गंभीर इशारा देत निदर्शन करत सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला….

यावेळी आकाश राजपूत, गोपाळ पाटील, लीलाधर चौधरी, प्रशांत चौधरी, मोहन बिडकर, विलास सोनवणे, योगेश सपकाळे, गोकुळ पाटील, धीरज चोपडे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.