Jalgaon News: पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २८ हिंदू पर्यटकांवर प्राणघातक हल्ला करीत त्यांना ठार केले. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शनिवारी (२६ एप्रिल) श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ‘शहीद अमर रहें’च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारले. विविध संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली आणि दहशतवादाविरोधातील निर्धार व्यक्त केला. शहरात विविध भागांत शहिदांना मानवंदना अर्पण करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर यांनी भावनिक भाषणात म्हटले, ‘देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्यांना आपण विसरू नये; त्यांच्या बलिदानातूनच आपले उद्याचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे.’
दहशतवादाचा तीव्र निषेध
श्रद्धांजली सभांमध्ये नागरिकांनी एकमुखाने घोषणा दिल्या, ‘शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही!’ ‘दहशतवादाचा ठाम निषेध!’ पाकिस्तानप्रेरित दहशतवादाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. अनेकांच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते.
या कार्यक्रमाला केशवस्मृती सेवा संस्था समूह प्रमुख डॉ. भरत अमळकर, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, खासदार स्मिता वाघ, क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिस शहा, नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, वि.हिं.प.चे ललित चौधरी यांच्यासह सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ठिकाणी झाल्या श्रद्धांजलीपर सभा
गणेश कॉलनी, पिंप्राळा, छत्रपती शिवाजी नगर, सिंधी कॉलनी, गणेश कॉलनी चौक, तरुण कुढापा चौक, भगवा चौक (नेहरू चौक), शिव कॉलनी, सुभाष चौक, चंदू अण्णा नगर, हरीविठ्ठल नगर, मेहरूण, अयोध्या नगर, सुप्रीम कॉलनी, वाल्मिक नगर, फुले मार्केट आणि पंचमुखी हनुमान मंदिर आदी ठिकाणी श्रद्धांजली सभा घेण्यात आल्या.