Jalgaon News : स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे गंभीररित्या भाजलेल्या 50 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगावातील रामेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या उषा गुलाब मोरे असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी, 22 मे रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने मोरे कुटुंबावर शोककळा पसरली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उषाबाई मोरे या आपला मुलगा सोनू आणि सून यांच्यासोबत रामेश्वर कॉलनीतील घरात राहत होत्या. सुमारे एक महिन्यापूर्वी त्या नेहमीप्रमाणे गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक सिलेंडरच्या नळीतून गॅसची गळती सुरू झाली. क्षणातच या गळतीमुळे आग भडकली आणि उषाबाई मोरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीमुळे त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, भाजल्यामुळे झालेल्या गंभीर जखमांवर उपचारांना यश आले नाही. अखेर गुरुवारी मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उषाबाईंच्या निधनाची बातमी कळताच जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.