---Advertisement---
Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद कमी असली तरी शहरात मात्र ठाकरे गट सध्यातरी मजबूत स्थितीत आहे. गत अडीच वर्षांत महापालिकेत सत्तेत राहिलेला ठाकरे गट महायुतीला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पक्षीय पातळीवर गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांना महायुतीत सामावून घेण्यासाठीदेखील सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
महिनाभरात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी चाचपणीदेखील सुरू केली आहे. जिल्ह्यात महायुती बळकट असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था युती करून लढणार की, स्वबळावर लढणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असले तरी ठाकरे गटाने मात्र महापालिका निवडणूक अंगावर घ्यायचे निश्चित केले आहे.
भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत
राज्यात सत्ताधारी व विरोधी पक्षात असलेल्या महायुती व महाविकास आघाडीतून लढायचे की, स्वतंत्र लढायचे याबाबत आता स्थानिक पातळीवर चाचपणी सुरू झालेली आहे. जळगाव शहरात भाजपची ताकद मोठी आहे. तर त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद अत्यंत कमजोर आहे. त्यामुळे शहरात भाजप आपल्या ताकदीच्या बळावर जास्तीत जास्त जागा घेऊन महायुतीत मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे.
नेत्यांचा भाजपसोबत जाण्यास ना?
२०१८ मध्ये महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या जास्त जागा आल्या होत्या. तब्बल ५७जागा येऊनही केवळ अडीच वर्षेच सत्ता मिळाली होती, कारण पक्षात मोठी फूट पडली होती. भरघोस यश मिळूनही महापालिकेत सत्ता टिकती नाही, याचे शत्य भाजपला अजूनही बोचत असून त्यावर पक्षात मंथन सुरू आहे. त्यासाठी नेत्यांनाच भाजपमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याकडे महापालिकेतील सत्तेचा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकही टिकून राहतात. परंतु ठाकरे गटाचे नेते महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये जाण्यास नकार देत असल्याचे सांगण्यात येते.
सक्षम विरोधक म्हणून पर्याय
शिवसेना ठाकरे गटाकडे आजच्या स्थितीत १२ माजी नगरसेवक आहेत. यात नितीन लढा, कुलभूषण पाटील, सुनील महाजन, माजी महापौर जयश्री महाजन, शरद तायडे, नितीन बरडे, इब्राहीम पटेल, श्यामकांत सोनवणे यांच्यासह इतर नगरसेवक सोबत आहेत. आज पक्षाकडे असलेले बारा नगरसेवक कट्टर आहेत. त्यांना म हापालिकेतील कामाचा अनुभव आहे. तसेच विरोधी पक्षात काम करण्यासाठी महापालिकेत कमी बळाची संख्या असतानाही सत्तांतर घडविण्याची ताकदही आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्यासाठी सक्षम विरोधक म्हणून शिवसेना ठाकरे गट महायुतीला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.