तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । राज्यात पसरलेली गोवरची साथ आता जळगाव शहरातही आली असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील एका भागात गोवरचे तब्बल अकरा रुग्ण आढळून आले आहेत. परंतु, या रुग्णांची प्रकृती चांगली असून उपचारानंतर ते घरीच आहेत, अशी माहिती महापालिकेच्या दवाखाना विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.
महापालिकेत नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार यांनी बुधवारी दि. ३० नोव्हेंबर रोजी महापालिका दवाखाना विभागाची बैठक घेत गोवर साथीबाबत जळगावातील स्थितीची माहिती घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात गोवरचे ११ रुग्ण आढळले आहेत.
ज्या भागात लसीकरणाला नकार देण्यात येतो, त्या भागातील हे रुग्ण आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागात आरोग्य विभागातर्फे सर्व्हे सुरू आहे तसेच ज्या मुलांना गोवरची लस दिलेली नाही, त्या मुलांना गोवरची लस महापालिका वैद्यकीय विभागातर्फे देण्यात येत आहे. काही भागात नागरिक लसीकरण करण्यास नकार देत आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. लसीकरण झालेल्या मुलांना अधिकचा डोस देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून आदेश येईल. त्यानुसार ते लसीकरण करण्यात येईल असही त्यांनी म्हटलं आहे.