जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याबाबत जागरूक आहेत. प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळावे. जेणेकरून त्यांचे आरोग्य सुदृढ राहील. त्यामुळेच सर्वत्र अमृत योजना सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून ही योजना अस्तित्वात अली आहे. जळगाव शहराला अमृत योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी हजारो कोटींचा निधी मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठीही निधी मिळाला. या योजनेच्या माध्यमातून भविष्यात जळगावकरांना २४ तास पाणी मिळेल, अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.
आमदार भोळे यांनी नुकतीच ‘तरुण भारत’च्या स्टुडिओला भेट दिली, त्या वेळी त्यांनी शहर विकासाचे व्हिजन सांगितले. प्रारंभी त्यांचे संचालक संजय नारखेड़े, निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांनी स्वागत केले. या वेळी आमदार भोळे म्हणाले की, २५ ते ३० टक्के आजार हे पिण्याच्या पाण्यामुळे होतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे. त्यासाठीच अमृत योजना आहे. शहरासाठी अमृत योजनाः त्याचप्रमाणे ग्रामीण भागासाठीही वेगवेगळ्या योजना आहेत. अमृत योजनेंतर्गत शहरात प्रत्येक नळाला मीटर लावण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची नासाडी कमी होईल आणि जळगावकरांना २४ तास शुद्ध पाणी उपलब्ध होईल. शुद्ध पाण्यासह लोकांना शुद्ध ऑक्सिजनही मिळावा, हा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरातील ७ ते ८ ठिकाणी ऑक्सिजन पार्कही देण्यात आले आहेत. यात झाडे लावून त्या भागातील लोकांना शुद्ध हवा मि ळावी, हा प्रयत्न आहे. अशा कितीतरी योजना पंतप्रधानांनी जनतेसाठी दिल्या आहेत.
हेही वाचा : गिरीश महाजन यांचं नाशिकचं पालकमंत्रिपद जाताच…, महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली
भरीव कामे झाली
शहरात गेल्या काही वर्षांत अनेक भरीव कामे झाली. मुख्यमंत्र्यांनी जळगाववर प्रेम दाखवीत मोठी मदत केली. ही मदत मी व जळगावकर कधीच विसरू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या मदतीने आम्ही महापालिका कर्जमुक्त करू शकलो. जिल्हा बँक कर्जमुक्त करू शकलो. यासह शिवाजीनगरचा उड्डाणपूल, आसोदा येथील उड्डाणपूल, पिंप्राळा रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल झाला. यासह शिव कॉलनी पुलाचे भूमिपूजन, समांतर रस्त्यांना ५५ ते ६० कोटींचा निधी मिळाला असून, त्यांचे काम सुरू आहे.
गुंठेवारी प्लॅट नियमित करणार
काही भागांत नागरिकांनी ग्रीन झोनमध्ये घरे बांधली आहेत. नियमानुसार, या भागातील नागरिकांना सोयी-सुविधा पुरविता येत नाहीत; पण या नागरिकांवर कुठलीही कारवाई न करता त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहेो भागातील नागरिकांना मूलभूत सविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी काळात सर्व गुंठेवारी आम्ही एनए करणार असल्याचेही आमदार भोळे यांनी सांगितले.
औद्योगिक विकासासाठी ३५० हेक्टर जागा
शहराच्या औद्योगिक विकासासाठी सरकार सकारात्मक आहे. त्या दृष्टीने उजाड कुसंबा ते चिंचोलीपर्यंत ३५० हेक्टर जागेचे सर्वेक्षण झाले आहे. त्याचा प्रस्तावही शासनदरबारी गेला आहे. त्या दृष्टीने लवकरच भूसंपादनाची कार्यवाही होणार आहे. एमआयडीसीच्या या जागेच्या प्रश्नासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
मार्चपर्यंत बायपासचे काम पूर्ण होणार
शहरात समांतर रस्त्यांचे काम सुरू आहे. आगामी काळात या रस्त्यांचे काम पूर्ण होईल आणि दुचाकीस्वार रस्त्यांचा वापर करतील. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. यासह येत्या मार्चपर्यंत महामार्गावरील बायपास सुरू होईल. याचा मोठा फायदा शहराला होणार आहे. यामुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती आमदार भोळे यांनी दिली.