Jalgaon Rural Assembly Constituency, दीपक महाले : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यातच काट्याची लढत झाली. मंत्री पाटलांनी तब्बल १५ वर्षांनंतर देवकरांचा पराभव करीत पुन्हा मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध केले. या मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाकडे राज्याच्या वर्तुळासह साऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते.
विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील गावे मिळून २००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा कायम राहिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीणचे प्रतिनिधित्व करतात. जळगाव ग्रामीण म तदारसंघात प्रामुख्याने शेतकरी मतदारांची संख्या मोठी आहे. विशेषतः या मतदारसंघात बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे जन्मगाव धरणगाव येते. शिवाय, बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव असोदाही याच मतदारसंघात आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच मतदारसंघात येते. त्यामुळे या मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
गेल्या तीन पंचवार्षिकच्या निवडणुका पाहिल्यास जळगाव ग्रामीणमध्ये तत्कालीन शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. जळगाव जिल्हा तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २००९ पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने आपली ताकद मतदारसंघात दाखविली आहे. भाजपचा प्रभाव असणाऱ्या या जिल्ह्यात विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील हे १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. मात्र, २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता. देवकर यांना ७१ हजार ५५६ मते, तर गुलाबराव पाटील यांना ६६ हजार ९९४ मते मिळाली होती. देवकर यांना त्यावेळी भाजप-शिवसेनेची युती असताना भाजपचे नेते पी. सी. पाटील यांनी उघड साथ दिली होती, तरी शिवसेनेत गुलाबराव पाटील यांचे महत्त्व कायम राहिले होते.
२०१४ मध्ये सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविल्याने शिवसेना-भाजप आमने-सामने होते. या निवडणुकीवेळी गुलाबराव पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी देवकर हे जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात होते. त्यामुळे २०१४ मधील निवडणुकीत गुलाबराव पाटील हे विजयी झाले. त्यांना ८४ हजार २० मते मिळाली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना सहकार राज्यमंत्रिपदी आरूढ केले होते. २०१९ मध्ये गुलाबराव पाटील यांनी भाजपचे अपक्ष म्हणून उभे राहिलेले उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे बंड मोडून काढत विजय मिळविला. गुलाबराव पाटील यांनी ४६ हजार ७२९
मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री अर्थात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत झाली. त्यात गुलाबराव पाटलांनी गुलाबराव देवकरांचा पराभव केला. मंत्री पाटील यांना एक लाख ४३ हजार ४०८, तर देवकरांना ८४ हजार १७६ मते मिळाली. ५९ हजार २३२ मतांनी गुलाबराव पाटील विजयी झाले. तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मंत्री पाटील यांनी देवकरांना पराभवाची धूळ चारली. या मतदारसंघातील लढत राज्यात लक्षवेधी ठरली.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील रावेर व अमळनेर हे मतदारसंघ वगळता नऊ जागा महायुतीने पटकाविल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून भाजप-महायुतीच्या रक्षा खडसे, तर जळगावमधून स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. स्मिता वाघ यांना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीणमधून ६० हजार मताधिक्य मिळाले होते.
मंत्रिपद मिळवून देणारा मतदारसंघ
२००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार झाल्यापासून विजयी झालेल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यात २००९ मध्ये देवकरांना परिवहन राज्यमंत्रिपद्, २०१४ मध्ये गुलाबराव पाटील यांना सहकार राज्यमंत्रिपद, तसेच २०१९ मध्ये गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री हे कॅबिनेट दर्जाचे पद व पालकमंत्रिपद मिळाले.
विविध समाजघटकांचाही प्रभाव
जळगाव ग्रामीण क्षेत्रात पाटील समाजाचा प्रचंड प्रभाव असून, २५ टक्के मतदार आहेत त्याखालोखाल मुस्लिम समाजाचे ८.५ टक्के, कोळी, सोनवणे व चौधरी समाजाचेही मोठे प्रमाण आहे. मात्र, गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांत पाटील समाजाचे वर्चस्व दिसून आले. निवडणुकीदरम्यान विविध समाजघटकांकडून गुलाबराव पाटील यांना पाठबळही मिळाले. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.