जळगाव: जळगाव येथे 27 डिसेंबरपासून होत असलेली राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा खेळाडूंसाठी आहे खूप महत्त्वाची… का ते वाचा..

जळगाव : येथील अनुभूती निवासी स्कूल मध्ये 27 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर मुला-मुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेतील पहिल्या सहा विजेत्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय व आशियाई स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. तर खेळाडूंना आपले फिडे मानंकन उंचावण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यासोबतच ग्रांड मास्टर ही उपाधीही या स्पर्धेतून मिळणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा बुध्दीबळ असोसिएशनचे अध्यक्ष्ा व जैन इरिगेशन कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय सब ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा 27 डिसेंबर 2023 ते 4 जानेवारी 2024 दरम्यान अनुभूती निवासी स्कुलमध्ये होत आहे. स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन, जैन स्पोर्ट्स अकादमी, महाराष्ट्र बुद्धिबळ असोशियन व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने घेण्यात येत आहे.

 

एकूण 9 लाखांची पारितोषीके, प्रथम विजेत्यास 90 हजाराचे पारितोषीक

स्पर्धा स्विस लीग प्रकाराने खेळविण्यात येणार असून स्पर्धकांना 11 फेऱ्यात विविध स्पर्धांशी मुकाबला करावा लागणार आहे. या स्पर्धेत एकूण 9 लाखांची रोख पारितोषिके व वयोगटानुसार प्रथम तीन विजेत्यांना चषक देण्यात येतील. प्रत्येक सहभागी खेळाडूंना पदके देण्यात येतील. या संपूर्ण स्पर्धेचे प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांनी स्वीकारले आहे.

देशभरातील 214 खेळाडूंचा सहभाग
या राष्ट्रीय स्पर्धेत जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील विविध पंचवीस राज्यातील 215 मुले व मुली खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यात सीएम मयंक चक्रवर्ती आसाम (फिडे मानांकन 2403) एफ एम दक्ष्निगा तैन्नारासू तामिळनाडू 2332, सीएम शेख सुमेर अर्श तेलंगाना 22 55, एफएम शुभी गुप्ता उत्तर प्रदेश, साची जैन दिल्ली या विविध टायटल प्राप्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवाला आहे.

 

https://fb.watch/p6sHmhtagI/

 

25 राज्यांतील 186 फिडे मानांकीत खेळाडू

128 मुलांपैकी 114 तर 86 मुलींपैकी 72 फिडे मानांकन प्राप्त खेळाडू असे 214 खेळाडू आहेत. यात जळगावचे 8 खेळाडू सहभागी होत आहेत. यासोबतच महाराष्ट्र, आसाम, तामिळनाडू, तेलंगाना, राजस्थान, आंध्र प्रदेश , दिल्ली, वेस्ट बंगाल, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब ,चंदिगड, हरियाणा, केरळ, गोवा, उत्तराखंड, झारखंड, उडीसा, त्रिपुरा या पंचवीस राज्यांमधून खेळाडू येत आहे.

स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीस बरूआ, पुणे येथील आंतरराष्ट्रीय पंच विनिता श्रोती व त्यांच्या मदतनीस नऊ पंच असतील.

सर्व खेळाडूंची व संघ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक यांची निवास व्यवस्था जैन इरिगेशन सिस्टीम द्वारे करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुख शेख, सदस्य जैन स्पोटर्स अकादमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे हे उपस्थित होते.