जळगावात हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद; गारठा आणखी वाढणार

जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरताना दिसत असून यामुळे जळगावात गारवा वाढत आहे. सोमवारी जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी जळगाव शहराचा पारा १३.२ अंशावर पोहोचला होता. रात्रीच्या तापमानासोबतच दिवसाच्या तापमानातदेखील घट होत असून, तीन दिवसांपूर्वी ३५ अंशावर असलेले जळगावचे तापमान सोमवारी ३२ अंशापर्यंत खाली घसरले होते. दरम्यान, आगामी आठवडाभरात तापमानात अजून घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे थंडी वाढली तर त्यामुळे रब्बी पिकांना फायदा होणार आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून हिमालयीन भागामध्ये बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय होणार आहेत. त्यातच बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रवाती हवांचे कोणतेही क्षेत्र सध्या नसल्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तापमानात अजून घट होणार आहे. आगामी तीन ते चार दिवसात रात्रीचे तापमान १२ अंशापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या ९० होण्याची शक्यता आहे.