Jalgaon ZP News: ‘माझी वसुंधरा ४.०’ स्पर्धेत ४ बक्षीस ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पुरस्कार जाहीर

जळगाव : पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा ४.०’ २०२३-२४ स्पर्धेत जळगाव जिल्हा परिषदेने ४ बक्षीस प्राप्त केली आहेत. तर विभाग स्तरावर सर्वकृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . या अभियानात सलग चौथ्या वर्षी जळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय तसेच विभागस्तरीय बक्षीस मिळविले आहे.

तसेच, अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनाही पुरस्कार जाहीर झाला. माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारात जळगाव जिल्ह्याचा डंका राहिला आहे . महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा (माय अर्थ) हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

विभागाकडून हाती घेतलेला हा भारतातील पहिला एकात्मिक उपक्रम आहे जो निसर्गाच्या पंचमहाभूतातील पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश असून त्यातून राज्याच्या शाश्वत विकासाप्रति प्रयत्न केले जातात. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणीय समस्यांच्या परिणामांची जाणीव करून देणे आणि पर्यावरण सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. महाराष्ट्राचा शाश्वत विकास सुनिश्चित करणे आणि राज्यस्तरावर ठोस वातावरणीय कृती करणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात राज्यातील ४१४ नागरी व २२ हजार २१८ ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या . तर जळगांव जिल्ह्यातील ११४९ ग्रामपंचायतीनी या अभियानात सहभाग नोंदविला होता .जळगांव जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील ,रावेरचे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व ग्रामपंचायत विभागाचे सर्व अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्याला हे यश प्राप्त झाले आहे.

जाहीर झालेले पुरस्कार
सर्वोत्तम कामगिरी विभाग स्तर बक्षीस – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,जळगांव

१० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गटात

राज्यस्तरावर- चिनावल ता .रावेर ग्रा. पं. (१ कोटी ७५ लक्ष रुपये )

५ ते १० हजार लोकसंख्या गटात
केऱ्हाळे ता .रावेर ग्रामपंचायत (५० लक्ष)

उंच उडी स्पर्धा
चिनावल ता .रावेर ग्रामपंचायत ( ५० लक्ष रुपये )

“पुढील वर्षासाठीचेही सूक्ष्म नियोजन करून व मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळविण्याचे लक्ष जळगांव जिल्हा परिषदेने ठेवले आहे त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरु आहे.बक्षीस पात्र ग्रामपंचायती,तेथील पदाधिकारी व अधिकारी त्या सोबतच उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील ,गटविकास अधिकारी रावेर व त्यांच्या टीम चे मी अभिनंदन करतो .
– श्री . अंकित , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव