जळगाव : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2022-23 या वर्षाच्या स्पर्धेचा निकाल आज घोषित करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जाहिर झाला आहे. या अभियानातंर्गत 13 पैकी 2 पारितोषिके जळगाव जिल्ह्याला मिळाली आहेत. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याने आघाडी मारली आहे.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरीता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्ध राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्तावात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. तर विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावात जिल्हाधिकारी जळगाव यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप करुन राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे.
त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात विकास नवाळे, मुख्याधिकारी, एरंडोल नगरपालिका यांनी बचतगटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना 50 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
येत्या नागरी सेवा दिनी 21 एप्रिल, 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार असून या अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.