जळगाव : गेल्या 30 वर्षांपासून अबुधाबी शहरात कार्यरत असणार्या महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष पदाची धुरा अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
जगभरात अनेक देशात कर्तृत्व गाजवितानाच मराठी माणसांकडून मराठमोळी नाळ जोपासलेली जावी, यासाठी जगभरात मजळगाव हाराष्ट्र मंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने अबुधाबी शहराचा समावेश आहे. यासाठी दरवर्षी नवीन सदस्यांकडे मंडळाची जबाबदारी सोपविण्यात येते. त्यानुसार या वर्षाची जबाबदारी वार्षिक सर्वसाधारण सभेचे निश्चित करण्यात आली.
हॉटेल नोव्हटेलच्या सभागृहात झालेल्या सभेत 2023 -2024 या वर्षांची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात नूतन अध्यक्षपदी अमळनेरचे सुपुत्र भूषण चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर सचिवपदी कोमल तावडे, खजिनदार स्वाती भोळे यांची निवड झाली. या कार्यकारिणीत दर्पण सावंत, संजीव गुरव, संजय चौलकर, अनिल वायकर, प्रसाद देशपांडे, डॉ. प्रसाद बारटक्के, गीता माहीमकर, निहाल मांडके, अक्षय फणसे यांची निवड झाली. मंडळाच्या आर्थिक लेखापरीक्षक म्हणून प्रतीक्षा मुनीश्वर काम पाहणार आहेत.
मावळते अध्यक्षांचा सत्कार
मावळते अध्यक्ष आनंद नेवगी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटील, विश्वस्त नरेंद्र कुलकर्णी, प्रिया पाकळे नवीन विश्वस्त धनंजय मोकाशी यांचे स्वागत करून त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. मावळत्या कार्यकारिणीचे सरचिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.
गेल्या 30 वर्षापासून अबुधाबी शहरात महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे. मराठी अस्मिता व महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा टिकविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कला, सांस्कृतिक, मनोरंजन तसेच अनेक प्रकारच्या समाजोपयोगी कार्यक्रम या मंडळाकडून आयोजित केले जातात. त्यासाठी मंडळाचे सर्वच सदस्य व कार्यकारणी प्रयत्नशील असतात.