जळगाव : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जळगाव जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून, थंडी पूर्णतः गायब झाली आहे. उन्हाचा चटका अधिक तीव्र होत असून, सोमवार (ता. १७) रोजी जळगाव शहरात कमाल तापमान ३५.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत तापमान ३७ ते ३९ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पहाटे व रात्री थंडी जाणवत होती. मात्र, तापमान वाढू लागल्याने हा गारवा पूर्णतः नाहीसा झाला आहे. सोमवारी जळगावचे किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस होते, तर कमाल तापमान ३५.७ अंशांवर पोहोचले. दिवसा उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवत आहे. पहाटे थोडी गारठा जाणवला तरी दुपारचे तापमान चढत्या क्रमाने वाढत आहे.
हेही वाचा : सावधान! जळगावात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, तीन वर्षीय बालक बाधित
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे दिवसा तापमान वाढते, तर रात्री आकाश निरभ्र राहिल्याने उष्णता लवकर बाहेर पडते. परिणामी, पहाटेच्या वेळी तापमानात मोठी घट होते. यंदा निनाचा प्रभाव नसल्याने हिंदी महासागरातील उष्णतेचा परिणाम तापमान वाढीवर दिसत आहे. याशिवाय, वाढत्या जंगलतोडीमुळेही तापमानवाढीला चालना मिळत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
तापमानातील मोठ्या चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी-खोकला, ताप, डिहायड्रेशन आणि उष्णतेचे ताण असे आजार बळावण्याची शक्यता आहे. याशिवाय, बाष्पीभवन वाढल्याने जलस्रोतांची पाणी पातळी घटण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
मार्च-एप्रिलमध्ये उष्णतेचा कहर?
फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाचा तडाखा जाणवत असताना आगामी मार्च आणि एप्रिलमध्ये तापमान किती वाढणार? हा प्रश्न सर्वसामान्य जळगावकरांसमोर आहे. मागील २०१५ साली फेब्रुवारी महिन्यात जळगावचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. मात्र, यंदा फेब्रुवारीतच ३५.७ अंशांवर पोहोचल्याने पुढील काळात तापमान अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.