आपल्या माहिती हव्याच अशा जनसुरक्षा योजनांना ८ वर्षे पूर्ण; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, (पीएमजेजेबीवाय), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ( पीएमएसबीवाय) आणि अटल निवृत्ती योजना ( एपीवाय ) या तीन जनसुरक्षा योजनांचा 8 वा वर्धापनदिन साजरा करत असताना, या योजनांमुळे नागरिकांना परवडणाऱ्या दरात विमा आणि सुरक्षेचा कसा लाभ झाला, त्यांची यशस्विता आणि वैशिष्ट्ये यांची उजळणी करूया.

पीएमजेजेबीवाय , पीएमएसबीवाय आणि एपीवाय या योजनांचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 मे , 2015 रोजी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे झाला.

या तीन योजना नागरिकांचे कल्याण, मानवी आयुष्याचे कोणत्याही दुर्दैवी घटनेमध्ये तसेच आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षण करण्याची गरज यांना समर्पित करण्यात आल्या आहेत. देशाच्या असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन योजना सरकारने आखल्या तर वृद्धावस्थेतील अनिश्चिततेपासून संरक्षण देण्यासाठी अटल निवृत्ती योजना आखली गेली.

या तीन जनसुरक्षा योजना सुरु करण्यामागची संकल्पनेला उजाळा देत केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन म्हणाल्या, ” प्रत्येक भारतीय नागरिकाला बॅंकेची सुविधा , आर्थिक साक्षरता तसेच सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध असावे या प्राथमिक हेतूने, 2014 साली आर्थिक समावेशकतेसाठी राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली. या संकल्पनेला पुढे नेत, देशात आर्थिक समावेशकतेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी या तीन जनसुरक्षा योजनांचा आरंभ केला.”

केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या,” या तीन सामाजिक सुरक्षा योजना नागरिकांचे कल्याण तसेच कोणतीही दुर्दैवी जोखीम, घटना किंवा आर्थिक अनिश्चिततेपासून मानवी जीवनाचे रक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश अधोरेखित करण्यासाठी बनवण्यात आल्या आहेत. वंचित पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना आवश्यक आर्थिक सेवा उपलब्ध करून त्यांची आर्थिक जोखीम कमी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे..”

आठव्या वर्धापनदिनी या तीन जनसुरक्षा योजनांची आकडेवारी देत श्रीमती सीतारामन म्हणाल्या की 26 एप्रिल 20230पर्यंत 16.2 कोटी , 34.2 कोटी आणि 5.2 कोटी ग्राहकांची नावनोंदणी अनुक्रमे पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय आणि एपीवाय या योजनांमध्ये झाली आहे.

पीएमजेजेबीवाय या योजनेविषयी अर्थमंत्री म्हणाल्या की यामुळे 6.64 लाख कुटुंबांना 13,290 कोटी रुपयांचे दावे प्राप्त झाले आहेत.

श्रीमती सीतारामन यांनी सांगितले की पीएमएसबीवाय योजनेअंतर्गत 1.15 लाखांहून अधिक कुटुंबांना 2,302 कोटी रुपयांचे झाले प्राप्त झाले आहेत. या दोन्ही योजनांसाठी केलेल्या सुलभ दावा प्रक्रियेमुळे दावा रक्कम शीघ्र गतीने मिळू लागली, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत किसनराव कराड म्हणाले, ” ग्रामीण भागातील नागरिकांना संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने लक्ष्यित पद्धत स्वीकारली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी देशभरातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मोहीम उघडली आहे.”

या जनसुरक्षा योजना लोकप्रिय केल्याबद्दल कार्यक्षेत्रावरील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना डॉ. कराड यांनी योजनांची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

जनसुरक्षा योजनांचा 8 वा वर्धापनदिन साजरा करताना आपण त्यांची वैशिष्ट्ये आणि आतापर्यंतचे यश जाणून घेऊया.

 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय )
योजना: पीएमजेजेबीवाय ही एक वर्षाची जीवन विमा योजना असून दरवर्षी नूतनीकरण करून कोणत्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूची आर्थिक भरपाई यामुळे मिळू शकते.

पात्रता : स्वतःचे बॅंक खाते किंवा टपाल कार्यालयात खाते असणारी 18-50 वर्षे या वयोगटातील व्यक्ती या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकते. वयाची 50 वर्षे पूर्ण होण्याआधी योजनेत सहभागी झालेल्या व्यक्तीला वयाच्या 55 वर्षांपर्यंत नियमित हप्ता भरून विमालाभ चालू ठेवता येतो.

लाभ : दरवर्षी 436 रुपये हप्ता भरून कोणत्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूप्रसंगी 2 लाख रुपयांचे विमाकवच

नावनोंदणी : या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी खाते असलेल्या बॅंकेच्या शाखेत, बीसी केंद्र किंवा संकेतस्थळावर किंवा टपाल कार्यालय बचत खाते असलेल्या टपाल कार्यालयात ही सेवा उपलब्ध होते. या योजनेचा हप्ता ग्राहकांच्या बॅंक खात्यातून, सुरुवातीला एकदा अर्ज केला असल्यास, दरवर्षी स्वयंचलित पद्धतीने वळता होतो.

या योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज ( हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधील ) https://jansuraksha.gov.in येथे उपलब्ध आहेत.

यशस्विता : 26.04.2023 पर्यंत या योजनेची संचयी नावनोंदणी 16.19 कोटींहून अधिक आहे तर 13,290.40 कोटी रुपये 6,64,520 दाव्यांपोटी वितरित करण्यात आले आहेत.

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ( पीएमएसबीवाय )
योजना : पीएमएसबीवाय ही एक वर्षाची अपघात विमा योजना असून तिचे दरवर्षी नूतनीकरण करता येते. या योजनेअंतर्गत अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमाकवचाचा लाभ घेता येतो.

पात्रता : स्वतःचे बॅंक किंवा टपाल कार्यालयात खाते असणारी 18-70 वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते.

लाभ: दरवर्षी 20 रुपये हप्ता भरून अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचे विमाकवच ( आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये)

नावनोंदणी : स्वतःचे खाते असलेल्या बॅंकेच्या शाखेत, बीसी केंद्र किंवा संकेतस्थळावर किंवा टपाल कार्यालय बचत खाते असलेल्या टपाल कार्यालयात या योजनेअंतर्गत नोंदणी करता येते. या योजनेचा हप्ता ग्राहकांच्या बॅंक खात्यातून, सुरुवातीला एकदा अर्ज केला असल्यास, दरवर्षी स्वयंचलित पद्धतीने वळता होतो.

योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज (हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधील) https://jansuraksha.gov.in येथे उपलब्ध आहेत.

यशस्विता: 26.04.2023 पर्यंत या योजनेची संचयी नावनोंदणी 34.18 कोटींहून अधिक असून 2,302.26 कोटी रुपयांची रक्कम 1,15,951 दाव्यांपोटी वितरित करण्यात आली आहे.

 

अटल निवृत्तीवेतन योजना (एपीवाय)

पार्श्वभूमी : अटल निवृत्तीवेतन योजना सर्व भारतीयांमध्ये, विशेषतः गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये एकजिनसी सामाजिक सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने तयार करण्यात आली. असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना भविष्यातील अनिश्चिततेपासून आर्थिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना आखली. एपीवाय ही योजना सर्वसाधारणपणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन यंत्रणा ( एनपईएस ) यांच्या अंतर्गत निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास मंडळ ( पीएफआरडीए ) यांच्या माध्यमातून राबविली जाते.

पात्रता: 18 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व बॅंक खातेधारक, जे प्राप्तिकरदाते नाहीत, अशांसाठी या एपीवाय योजना खुली आहे. निवृत्तीवेतनाची रक्कम निवडल्यानंतर या योजनेत भरण्याचा हप्ता निश्चित होतो.

लाभ : ग्राहकांना या योजनेत सहभागी झाल्यावर भरावयाच्या रकमेनुसार, 1000 रुपये किंवा 2000 रुपये किंवा 3000 रुपये किंवा 4000 रुपये‌ किंवा 5000 रुपये एवढे हमीयुक्त किमान मासिक निवृत्तीवेतन मिळू शकते.

योजनेतील लाभाचे वितरण : ग्राहकाला मासिक निवृत्तीवेतन उपलब्ध असून त्याच्यानंतर ते त्याच्या जोडीदाराला आणि दोघांच्याही मृत्यूनंतर, ग्राहकाच्या 60 व्यावर्षी‌जमा होणारी रक्कम, ग्राहकाच्या वारसाला परत केली जाते.

ग्राहकाचा अकाली मृत्यू झाला तर ( 60 वर्षे वयाआधी ) ग्राहकाचा जोडीदार एपीवाय खात्यात मूळ ग्राहकाची 60 वर्षे होईतो निर्धारित मुदतीपर्यंत नियमित रक्कम जमा करणे चालू ठेवू शकतो.

केंद्र सरकारचे योगदान: सरकारने या योजनेसाठी किमान निवृत्तीवेतनाची हमी दिली आहे. उदाहरणार्थ, जर एकूण रक्कमेवर अंदाजित परताव्यापेक्षा कमी परतावा जमा झाला‌ असेल आणि तो किमान निवृत्तीवेतन देण्यासाठी अपुरा असेल तर ही तूट केंद्र सरकारतर्फे भरून काढली जाते. तसेच जर गुंतवणुकीवरील परतावा अधिक असेल तर ग्राहकाला अधिक निवृत्तीवेतनाचा लाभ मिळू शकतो.

रक्कम भरण्याची वारंवारता: ग्राहक आपल्या एपीवाय खात्यात मासिक, त्रैमासिक किंवा अर्ध वार्षिक पद्धत निवडून रक्कम जमा करू शकतो.

योजनेमधून माघार: ग्राहक काही ठराविक परिस्थितीत एपीवाय खाते , सरकारी योगदान रक्कम किंवा त्यावरील व्याज चुकते करून, बंद करू शकतो.

यशस्विता : 27.04.2022 पर्यंत 5 कोटींहून अधिक व्यक्ती या योजनेत सहभागी झाल्या आहेत.

पीएमजेजेबीवाय : 16 कोटींहून अधिक संचयी नावनोंदणी
पीएमएसबीवाय : 34 कोटींहून अधिक संचयी नावनोंदणी
एपीवाय : सुमारे 5 कोटी ग्राहक