मुंबई : शरद पवारांच्या नादी लागून मनोज जरांगे भरकटले आहेत. त्यामुळे कपटी शक्तींच्या संमोहनातून बाहेर पडा, असा सल्ला भाजप नेते अमित साटम यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. अमित साटम यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत हे वक्तव्य केले.
https://twitter.com/i/status/1814174579826282563
अमित साटम म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील आपण ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आणि उपोषणाला बसलात त्यावेळी एक सामान्य मराठा म्हणून मला आपला खूप अभिमान वाटला. खरंतर तुम्ही छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन करत होता. कारण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर जायचे त्यावेळी सामान्य जनता यात भरडली जाऊ नये, असे त्यांचे आदेश असायचे. परंतू, आता आपण शरद पवार साहेबांच्या नादी लागले असून कुठेतरी भरकटत जात आहात. तुम्हाला जो इतर समाजांचा पाठिंबा मिळत होता त्यापासून आपल्या बोलण्या वागण्यामुळे तुम्ही दुरावत जात आहात, असे मला वाटते. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो की, कपटी शक्तींच्या सम्मोहनातून आपण बाहेर पडावं. कारण आपल्यामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “खरंतर सगे सोयरे पुढे आणायचं आणि त्यांनाच राजकारणात मोठं करायचं असा शरद पवार साहेबांचा सुप्त अध्यादेश राहिलेला आहे. कारण आजपर्यंत शरद पवारांनी एकतरी गरीब मराठा कुटुंबातून येणाऱ्याला मोठं केलं असेल तर दाखवावं. तुमच्यात मराठा समाजाला न्याय आणि दिशा देण्याची कुवत आहे, हे शरद पवार जाणतात. त्यामुळे कदाचित तुमचा पॉलिटिकल गेम होत आहे,” असेही अमित साटम मनोज जरांगेंना म्हणाले आहेत.