धुळ्यात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जयंत पाटलांना घेराव

धुळे : येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेराव घातला. ते राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने शहरात सोमवार, २३ रोजी आले होते. यावेळी मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान,  आमदार पाटील यांनी निवेदन स्वीकारले, परंतु, त्यांनी कार्यकर्त्यांसोबत कोणताही संवाद केला नाही व तेथून निघून गेले. तसेच खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या कार्यकर्त्यांना टाळल्याचे चित्र दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रेचे आज सोमवार, 23 रोजी  धुळे आगमन झाले.  यापार्श्वभूमीवर शिवतीर्थ चौकातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि संसद रत्न खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेण्याचे निश्चित केले. यासाठी जेलरोडवर सुरू असलेल्या धरणे आंदोलनापासून पायी रॅली काढण्यात आली. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून शिवतीर्थ चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली.

या रॅलीत सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, राजेंद्र काळे,संदीप पाटोळे, मनोज ढवळे,हेमंत भडक, किशोर वाघ, दीपक रौंदळ, विनोद कणसे,कैलास वाघारे, वीरेंद्र मोरे, पवन मराठे, बाळासाहेब ठोंबरे, तुषार पाटील,संतोष लकडे, गोविंद वाघ, भानुदास चौधरी, मराठे, तुळशीराम मस्के , तुकाराम बागुल, सर्जेराव इथापे, सचिन नागणे,सुनील वरपे, प्रकाश चव्हाण, पांडुरंग हरळ, अभिनय राजाराम पाटील, बबलू बागुल, बाळू गायकवाड, अनिल बगदे, मनोज ढवळे, महेंद्र रगडे, सुरेश पाटील, सुरेश पवार, रवींद्र नागणे, संजय बगदे, खंडेराव परभणे, अमर फरताडे, मुकुंद शिंदे वामन मोहिते, नरेंद्र हेमाडे, मनोहर जाधव, अशोक बाबर, विक्रम काळे, उल्हास पाटील, प्रफुल माने, खंडू पवार अरविंद भोसले, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.