---Advertisement---
अमळनेर : शहरातील ढेकू रस्त्यावरील जय योगेश्वर कॉलनीत बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ४ एप्रिल रोजी उघडकीस आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅम `ऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली चंद्रकांत वाघ या १४ मार्चपासून पुणे येथे त्यांच्या मुलाकडे गेल्या होत्या. ४ एप्रिल रोजी त्यांच्या मुलाच्या मि त्राने घराचा कडी-कोंडा तुटलेला दिसत असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी जाऊन पाहणी केली तेव्हा घरातील कपाट उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी वाघ यांनी अमळनेर गाठत घराची पाहणी केली. यावेळी त्यांना कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ३० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १२ हजार रुपये किमतीच्या चार अंगठ्या, १० हजार रुपये किमतीचे ३० तोळे चांदीचे दागिने व १२ हजार रुपये रोख असा ६४ हजार रुपयांचा मुद्देमालासह तांबे, पितळ व कास्याची भांडे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यात चार चोरटे दिसून आले. त्यापैकी एक जण बाहेर पहारा देत असल्याचे तर इतरांनी घरफोडी केल्याचे दिसून आले.









