JSW समूह करणार EV क्षेत्रात प्रवेश – अध्यक्ष सज्जन जिंदाल

EV आणि बॅटरी प्लांट : देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी JSW समूहाने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आणि EV बॅटरी उत्पादनात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्ही सेक्टरमध्ये जेएसडब्ल्यू ग्रुपच्या प्रवेशामुळे मोठी खळबळ उडणार आहे. यासाठी कंपनी सुमारे 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे 11 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या प्लांटसाठी JSW ग्रुपने ओडिशा सरकारसोबत सामंजस्य करारही केला आहे.

जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले की, या ईव्ही आणि बॅटरी प्लांटमुळे ओडिशाशी आमचे संबंध अधिक दृढ होतील. याचा फायदा सर्व संबंधितांना होईल. याशिवाय नवे प्रयोग, रोजगार आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. ईव्ही क्षेत्रात प्रवेश करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्लांट कटक आणि पारादीपमध्ये उभारले जाऊ शकतात. यामुळे हरित ऊर्जा क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. या प्रकल्पांतर्गत 50 गिगावॅट क्षमतेचा इलेक्ट्रिक वाहन बॅटरी प्लांट उभारण्यात येणार आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहन, लिथियम रिफायनरी, कॉपर स्मेल्टर आणि पार्ट्स बनवण्याचे प्लांटही उभारले जाणार आहेत.